वाडा आगारातील विश्रामगृहाला टाळे ठोकले

रमेश पाटील

वाडा:  एसटी संपात सहभागी असलेल्या वाडा आगारातील  कर्मचाऱ्यांनी आश्रय घेतलेल्या येथील विश्रामगृहाला टाळे ठोकल्यामुळे या कर्मचाऱ्यांना मंदिराचा आसरा घ्यावा लागला आहे.

  गेल्या आठ दिवसांपासून राज्य परिवहन महामंडळाचे राज्यभरातील सर्वच कर्मचारी बेमुदत संपावर गेले आहेत. त्यात वाडा येथील बस आगारातीलही सर्वच कर्मचारी संपात सहभागी झाले आहेत. या ठिकाणी दोनशेहून अधिक कर्मचारी असून या कर्मचाऱ्यांमधील शंभरहून अधिक कर्मचारी हे विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आदी भागातील आहेत. यामधील काही कर्मचारी हे भाडय़ाने खोली घेऊन राहतात तर काही कर्मचारी हे खानावळीत जेवण करून एसटी आगारातील  विश्रामगृहात मुक्कामी असतात.

 आज, उद्या संप मिटेल या अपेक्षेत असलेल्या या कर्मचाऱ्यांनी गावी जाणे टाळले व त्यांनी  एसटीच्या विश्रामगृहात राहणे पसंत केले. मात्र मंगळवारी (९ नोव्हेंबर)  येथील कर्मचारी विश्रामगृहाला एसटी प्रशासनाने टाळे ठोकल्याने येथील विश्रामगृहात राहणाऱ्या ५०हून अधिक कर्मचाऱ्यांवर कुणी घर देता का घर, असे म्हणण्याची वेळ आली आहे.यामधील काही कर्मचारी आपल्या ओळखीच्या सहकाऱ्यांकडे राहात आहेत, तर ३५ कर्मचाऱ्यांनी वाडा एसटी आगाराच्या बाहेर असलेल्या दत्तमंदिराचा आसरा घेतला आहे. खानावळीत जेवण करायचे व मंदिरातील उघडय़ा मंडपात येऊन झोपायचे हेच सध्या सुरू आहे, असे या कर्मचाऱ्यांनी सांगितले.  अत्यंत तुटपुंज्या पगारावर काम करणारे येथील बहुतांशी कर्मचाऱ्यांनी १० रुपयांत मिळणाऱ्या शिवभोजनाचा आधार घेतला आहे. तर रात्री झोपण्यासाठी मंदिराचा आसरा घेतला आहे. सध्या थंडीचे प्रमाण वाढू लागले आहे. अशा परिस्थितीत मंदिरातील उघडय़ा मंडपात हे कर्मचारी झोपत असल्याचे चित्र दिसून येत आहे.प्रवाशांच्या सेवेसाठी रात्रंदिवस कष्ट करूनही संकटसमयी  एसटी प्रशासनच जर बेदखल करीत असेल तर यासारखे दुर्दैव ते कोणते अशी  प्रतिक्रिया कर्मचाऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.