कोकणातील पर्यटन, निसर्ग संपदा, लोककला व ग्रामीण उद्योगाला जागतिक व्यासपीठ उपलब्ध व्हावे या दृष्टीने गेल्या अनेक वर्षांपासून मुंबई येथे आयोजित केला जाणार ग्लोबल कोकण महोत्सव शिरगावच्या समुद्रकिनाऱ्यावर आयोजित केला जाणार आहे. या महोत्सवात कोकण सरस या उपक्रमाची जोड लाभली असून विविध सांस्कृतिक कार्यक्रमासह कोकणातील खाद्य संस्कृतीचा व महोत्सवा दरम्यान आयोजित केल्या जाणाऱ्या मराठी चित्रपट महोत्सवाचा आनंद पर्यटकांना लाभणार आहे. शिवाय पालघर जिल्ह्यातील शिरगाव समुद्र किनऱ्याला आदर्श बीच बनवण्या च्या दृष्टीने योजना तयार करण्यात येणार आहे.

पालघर जिल्ह्यात पर्यटन विकासाच्या दृष्टीने व स्थानिक व्यवसायांना चालना मिळावी आणि रोजगार निर्मितीला संधी मिळावी यासाठी कोकण भूमी प्रतिष्ठान यांच्या वतीने तसेच जिल्हा प्रशासनाच्या सहयोगाने जिल्ह्यातील प्रसिद्ध शिरगाव पर्यटन या स्थळी ग्लोबल कोकण महोत्सव २०२६ या अंतर्गत १८ ते २२ फेब्रुवारी या कालावधीत बीच फेस्टिवलचे आयोजन करण्यात आले आहे. उत्तर कोकण ते तळकोकण मध्ये पहिल्यांदाच इतक्या भव्य स्वरूपात बीच फेस्टिवल आयोजित केला आहे.

कोकण सरस या उपक्रम या महोत्सवामध्ये संलग्न आकर्षण ठरणार असून या महोत्सवाच्या प्रदर्शनात ४०० हून अधिक स्थानिक उद्योजक सहभागी होणार आहेत. तसेच कोकण सरस उपक्रमांतर्गत पालघर जिल्ह्यातील १०० पेक्षा अधिक महिला बचत गट महिला उद्योजकांचे स्वतंत्र प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. त्यामुळे महिला बचत गटांना आणि ग्रामीण उद्योजकांना मोठी बाजारपेठ उपलब्ध होऊन त्यांच्या उत्पादनांना जागतिक स्तरावर ओळख मिळण्याची संधी उपलब्ध होणार आहे.

लोककलेचा महासंग्राम या उपक्रमाचा भव्य बीच फेस्टिवल मध्ये समावेश करण्यात आला असून या महोत्सवात दररोज सुमारे २०० स्थानिक कलावंत लोककला महोत्सवात सहभागी होणार आहेत. यामध्ये कोकणातील आदिवासी संस्कृती दर्शवणारे तारपा नृत्य, सिंधुदुर्गातील दशावतार, रत्नागिरीतील झाकडी नृत्य, कोळी नृत्य तसेच विविध पारंपारिक कला, लोक कला व लोकनृत्यांचे सादरीकरण करण्यात येणार आहे.

शिरगावातील या महोत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे कोळी, आगरी, वाडवळ, मालवणी, कोकणी खाद्य संस्कृतीचे विविध स्वाद भव्य फूड फेस्टिवलमध्ये अनुभवता येणार आहेत. त्या महोत्सवात पाचही दिवस राजा रयतेचा हे भव्य महानाट्य १५० कलावंताच्या सहभागाने सादर केले जाणार आहे. नव्या पिढीला शिव संस्कार आणि शिव विचारांशी जोडणारा हा उपक्रम विशेष महत्त्वाचा असून परिसरातील अनेक शाळांचा यात सहभाग असणार आहे.

याशिवाय आकाशातून पालघरचे दर्शन घडविणारे पॅरामोटरिंग,समुद्रातील वॉटर स्पोर्ट्स, एडवेंचर टुरिझम, समुद्रकिनाऱ्यावरच ग्लोबल कोकण टेंट व्हिलेज व पर्यटकांसाठी कॅम्पिंग सुविधा असे अनेक आकर्षक उपक्रम या महोत्सवात आयोजित करण्यात आले आहेत.पालघर जिल्ह्यातील पर्यटन, शेती, मत्स्य, शिक्षण व सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या अनेक संस्था या उपक्रमात सहभागी होत असून मुंबई, पुणे संपूर्ण महाराष्ट्र व देशभरातील पर्यटकांनी या भव्य सागरी महोत्सवात सहभागी व्हावे पालघर जिल्ह्याचा निसर्ग संस्कृती आणि पर्यटन अनुभवावे असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

महोत्सवाचे वैशिष्ट्य

कोकण सरस च्या आयोजनामुळे बचत गटांमार्फत खाद्यपदार्थ व स्थानिक उत्पादने उपलब्ध होणार इतर जिल्ह्यातील वैशिष्ट्य जिल्हा वासीयाला सहज मिळणार सर्वात मोठ्या बीच फेस्टिवलमुळे पर्यटनाला चालना देण्यासोबत भरवल्या जाणाऱ्या उद्योग संमेलनात मराठी व स्थानिकांचा अधिक तर सहभाग राहणारलोककला महोत्सव, कोळीवाडा पद्धतीने टेन्ट कॅम्पिंग ची निवास व्यवस्था, निर्यात औद्योगिक परिषद, साहसी पर्यटन (एडवेंचर टुरिझम), खाद्य महोत्सव, समुद्रकिनारी मराठी चित्रपट महोत्सव

समुद्रकिनाऱ्यावर पहिला मराठी चित्रपट महोत्सव

कोकणच्या समुद्र किनाऱ्यावर प्रथमच मराठी चित्रपट महोत्सव आयोजित करण्यात येणार आहे. अलीकडच्या काळात कोकणात चित्रीत झालेले आणि लोकप्रिय ठरलेले कुर्ला टू वेंगुर्ला, एप्रिल मे आदेश यासारखे निवडक मराठी चित्रपट थेट समुद्राच्या वाळूवर बसून स्थानिक नागरिक व पर्यटकांना पाहता येणार आहेत यासाठी व्यवस्था देखील तशी करण्यात आली आहे.