पालघर : महाराष्ट्र सागरी मंडळाच्या माध्यमातून चार कोटी रुपये निधी मधून शिरगाव समुद्रकिनाऱ्यावर तयार करण्यात आलेल्या वॉकिंग ट्रॅक लगतचा सिमेंटचा उतार (रॅम्प) गेल्या आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसाच्या पाण्याने पूर्णपणे उखडून गेला. या उध्वस्त झालेल्या उताराच्या दुरुस्तीचे काम तातडीने हाती घेण्यात आले आहे.

शिरगाव समुद्रकिनारी वीर सावरकर मैदानापासून शाळेच्या मागील समुद्रकनाऱ्यापर्यंत पादचारी मार्ग (वॉकिंग ट्रॅक) उभारण्यात आला असून या ट्रेक वरून विविध ठिकाणी समुद्र किनाऱ्यावर जाण्यासाठी उतार (रॅम्प) तयार करण्यात आले आहेत. सावरकर मैदानाच्या बाजूला मुख्य रस्त्याला जोडणाऱ्या रस्त्यावरून समुद्रावर थेट उतरण्यासाठी सुमारे सात मीटर रुंदीचा रॅम्प तयार करण्यात आला होता. मात्र गेल्या आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे तसेच किनाऱ्यावरील समुद्री लाटांमुळे हा उतार पूर्णपणे तुटण्याचा प्रकार घडला.

या संदर्भात महाराष्ट्र सागरी मंडळाशी संपर्क साधला असता या ठिकाणी असणाऱ्या दोन वेगवेगळ्या उंचीच्या जुन्या उतार (रॅम्प) ना समान पातळीवर आणण्यासाठी त्यावर कॉंक्रिट साखर अंथरण्यात आला होता. मुळात हे जुने बांधकाम होते व मुसळधार पावसाच्या दरम्यान वाहून आलेल्या पाण्याच्या प्रवाहाने खालची संपूर्ण माती आणि वाळू वाहून गेली असून, काँक्रीटचे मोठे थर हवेत लोंबकळत राहिले होते.

महाराष्ट्र सागरी मंडळाच्या अधिकाऱ्यांनी घडलेल्या प्रकाराची पाहणी करून संबंधित ठेकेदाराला या ठिकाणी नव्याने उतार रॅम्प उभारण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. उखडल्या गेलेल्या भागाचे खोदकाम करून त्या ठिकाणी सिमेंट पीसीसी करण्यात आले असून त्यावर डाबर अंथरून नंतर बांधकाम करण्यात येईल असे त्या ठिकाणी असणाऱ्या पर्यवेक्षकांनी सांगितले.

वॉकिंग ट्रॅकच्या बाजूला मोठ्या प्रमाणात दगड टाकण्यात आले आहेत. त्या दगडामध्ये मोठ्या प्रमाणात भेगा असल्यामुळे त्या भेगांमध्ये पाय जाऊन नागरिकांना इजा होऊ शकते अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. पुढील काही दिवसात ५.५० मीटर पेक्षा अधिक उंचीची भरती येणार असून या कामाला त्याची बाधा होऊ नये अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. या संपूर्ण प्रकाराची व झालेल्या कामाची त्रयस्थ संस्थेकडून तपासणी करावी अशी मागणी देखील पुढे आली आहे.

याविषयी मेरीटाईम बोर्डाचे बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता तुषार शेवाळे यांच्याशी भ्रमणध्वनिद्वारे संपर्क केला नव्याने उभारण्यात आलेल्या उतार व्यवस्थित असून जुन्या उताराच्या ठिकाणी किनाऱ्यालगत चा भाग वाहून गेल्याने ते संपूर्णपणे काढून नव्याने तयार करण्याच्या सूचना ठेकेदार देण्यात आले आहेत. महाराष्ट्र सागरी मंडळाने अलीकडे पूर्ण केलेल्या कामाच्या दर्जा समाधान कारक असून या रस्त्याला समुद्रकिनाऱ्यावर जोडणारा उतार लवकरच पूर्ववत करून देण्यात येईल असे त्यांनी लोकसत्ताला सांगितले.