निवडणूक बिनविरोध

ओबीसी आरक्षणानंतर बदललेल्या संख्याबळाच्या आधारावर सत्तापालट करण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीमधील एका गटाने केला होता.

जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी शिवसेनेच्या वैदेही वाढाण, तर उपाध्यक्षपदी राष्ट्रवादीचे ज्ञानेश्वर सांबरे

पालघर: गेल्या काही दिवसांपासून सत्तापालटेच्या चर्चेत रंगलेली पालघर जिल्हा परिषदेची अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवडणूक अखेरीस बिनविरोध झाल्याने राजकीय घडामोडींवर पडदा पडला आहे. अध्यक्षपदी शिवसेनेच्या वैदेही वाढाण तर उपाध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्ञानेश्वर (शिवा) सांबरे निवडून आले आहेत.

ओबीसी आरक्षणानंतर बदललेल्या संख्याबळाच्या आधारावर सत्तापालट करण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीमधील एका गटाने केला होता. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व जिल्हा परिषद सदस्यांनी एक संघ राहण्याचे पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी आदेशित केल्याने शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस तसेच बहुजन विकास आघाडी यांनी जिल्हा परिषदेच्या सत्तेत एकत्रितपणे सहभागी होण्याचा पूर्वीचे सूत्र कायम ठेवण्यात आले.

अध्यक्ष व उपाध्यक्षपदाकरिता   मंगळवारी झालेल्या निवडणुकीसाठी भाजपतर्फे अनुक्रमे सुरेखा थेतले व महेंद्र भोणे यांनी अर्ज भरले होते. मात्र पदाधिकाऱ्यांच्या निवडीसाठी दुपारी तीन वाजता आयोजित विशेष सभेच्या आरंभी भाजपच्या दोन्ही उमेदवारांनी आपली उमेदवारी मागे घेतल्याने महा विकास आघाडीचे उमेदवार बिनविरोध निवडून आले.

नेतेमडळींची मंदियाळी

राष्ट्रवादीतील घडामोडींमुळे निवडणुकीकडे शिवसेना व राष्ट्रवादी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांचे लक्ष लागून राहिले होते.    कृषिमंत्री तथा पालघरचे पालकमंत्री दादा भुसे, सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, गृहनिर्माण मंत्री आमदार जितेंद्र आव्हाड यावेळी उपस्थित होते.  खासदार राजेंद्र गावित, तसेच  रविंद्र फाटक,  सुनिल भुसारा,  राजेश पाटील,   विनोद निकोले,  श्रीनिवास वनगा हे आमदारदेखील   उपस्थित होते.

इतिहास घडवण्याचे दावे विफल

२० जुलै रोजी ‘पालघरचा इतिहास डोंबिवली घडविणार’ या आशयाची घोषणा काही दिवसांपूर्वी भाजपच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी समाजमाध्यमांवर ठेवली होती. जिल्हा परिषदेमध्ये सत्तापालट होणार या आत्मविश्वासात असणाऱ्या भाजप, निवडणूक प्रक्रियेच्या अखेरच्या टप्प्यात एकाकी पडल्याचे दिसून आल्याने  घोषणा फुसकी ठरली.

पत्रकार ते जिल्हा परिषद अध्यक्ष

वाडा तालुक्यातील कंचाड येथील पदवीधर असलेल्या वैदेही वाढाण या विवाहानंतर बोईसर (सालवड) येथे वास्तव्य करीत आहेत. सन २०१२ मध्ये ठाणे जिल्हा परिषदेवर त्या निवडून गेल्या होत्या, मात्र ऑगस्ट २०१४ मध्ये पालघर जिल्ह्यची निर्मिती झाल्यानंतर त्यांचे जिल्हा परिषद सदस्यत्व रद्द झाले.  त्यांनी काही काळ स्थानिक वृत्तपत्र व नंतर मुंबई येथून प्रसिद्ध होणाऱ्या दैनिकांसाठी वार्तांकन केले. शिवसेना महिला आघाडीच्या उपजिल्हा संघटक पद भूषवित आहेत.

सन २०२० मध्ये पालघर तालुक्यातील दांडी गटातून विजयी झाल्यानंतर त्यांचे नाव जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीमध्ये होते. एका मध्यमवर्गीय कुटुंबातून वाटचाल करणाऱ्या आदिवासी गृहिणी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी विराजमान झाल्या आहेत.

अध्यक्षपदासाठी इच्छुक अमिता घोडा गैरहजर

पालघरचे माजी आमदार दिवंगत कृष्णा घोडा यांच्या स्नुषा व माजी आमदार अमित घोडा यांच्या पत्नी शिवसेनेच्या जिल्हा परिषद सदस्य अमिता घोडा या जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी इच्छुक होत्या. परंतु त्यांना डावलले गेल्यामुळे त्या पदाधिकाऱ्यांच्या निवडणुकीच्या निमित्ताने आयोजित विशेष सभेला गैरहजर राहिल्या. सन २०१८ च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेकडून तिकीट न मिळाल्याने मावळते आमदार अमित घोडा यांनी राष्ट्रवादीमधून उमेदवारी दाखल केली होती. मात्र काही तासातच त्यांनी आपली उमेदवारी नाटय़मय पद्धतीने मागे घेऊन शिवसेनेतच राहत असल्याचे जाहीर केले होते. अमित घोडा यांचे वडील कृष्णा घोडा यांनी २०१४ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस सोडून शिवसेनेत प्रवेश करत पालघरची आमदारकी पटकावली होती. आपल्यावर अन्याय होत असल्याने  अमित घोडा कुटुंबीय नाराज असून त्यांनी आपली नाराजी पदाधिकाऱ्यांच्या निवडणुकीदरम्यान दर्शवली आहे. भाजपच्या पदाधिकारी निवडणुकीतील उमेदवारांनी आपले नामनिर्देशन मागे घेतल्यानंतर या सभेतून सभात्याग करणे पसंत केले. त्यामुळे अध्यक्ष-उपाध्यक्ष यांची निवड होताना सभागृहातील ४२ पैकी नऊ सदस्य गैरहजर होते.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व पालघर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Shiv sena vaidehi wadhan zilla parishad president ssh