पालघर : शिंदे यांच्याकडे बुद्धीच नसल्याने ते भाजपच्या रिमोट कंट्रोल प्रमाणे त्यांच्या इशाऱ्यावर चालत आहेत. शिंदे गटावर भाजपची पकड असून भाजप सांगते तसा हा गट करतो अशी घणाघाती टीका मुंबईचे माजी महापौर व उद्धव ठाकरे गटाचे पदाधिकारी विश्वनाथ महाडेश्वर यांनी पालघरमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविषयी बोलताना केली. शिवगर्जना मोहिमेअंतर्गत ते पालघरमध्ये आले होते.
नरेंद्र मोदी यांनी गंगेत डुबकी मारली म्हणून सर्व प्रश्न सुटणारे नाहीत. चाय, परीक्षा पे चर्चा होत असेल तर आज सर्व ठिकाणी सुरू असलेला अन्याय लक्षात घेता अन्याय पे चर्चा करायला हवी असा आरोप त्यांनी केंद्र सरकारवर केला.अनेक पोकळ आश्वासने सरकारने दिली पण ती सर्व हवेतच विरली. याउलट महागाईचा भडका, सर्वत्र अन्याय सुरू असल्याचे आरोप महाडेश्वर यांनी केले.
हेही वाचा >>> दहा वर्षीय मुलीवर बलात्कार करून केला खून; पालघरमधील तलासरी तालुक्यातील धक्कादायक घटना
भाजप व शिंदे गटाला भीती असल्याने आजवर महापालिका व इतर निवडणुका घेतल्या नाहीत, असे महाडेश्वर यांनी म्हटले. विशिष्ट धर्माच्या नावाखाली नारा द्यायचा व नागरिकांची मने वळवून मतांचे राजकारण करायचे असे प्रकार सध्या सुरू आहेत अशी टीका त्यांनी सरकारवर केली.मात्र हे सरकार जास्त काळ टिकणारे नाही. त्यांचा अस्त जवळ आलेला आहे असेही त्यांनी कार्यक्रमात कार्यकर्त्यांना संबोधताना म्हटले. पालघरचे आमदार यांना साधी फुक मारली तरी उडून जातील असे ते पूर्वी होते. मात्र आता ते शिंदे गटाकडे जाऊन चांगलेच धस्ट पुस्ट झाले असल्याची खिल्ली महाडेश्वर यांनी उडवली. पालघर जिल्ह्यातील विविध समाज आजही शिवसेनेच्या पाठीशी खंबीर असून आगामी निवडणुकांमध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला ते कौल देतील असा विश्वास महाडेश्वर यांनी शिवगर्जना यात्रेनिमित्त माहीम-मनोर हायवे येथील कार्यक्रमात व्यक्त केला. शिवगर्जना यात्रेमध्ये पालघर मध्ये मोठ्या संख्येने बाईक रॅली काढण्यात आली तर आयोजित केलेल्या कार्यक्रमामध्ये जिल्ह्यातील हजारो शिवसैनिक उपस्थित होते.