तलासरी-उंबरगाव मार्गावर दुचाकी घसरून सहा अपघात; आरोग्याचा प्रश्नही ऐरणीवर

कासा: तलासरी नगर पंचायत क्षेत्रातील गोळा केलेला कचरा तलासरी-उंबरगाव रस्त्यावर टाकून दिला जात आहे. ओला कचरा रस्त्यावर टाकल्याने निसरडा होऊन अपघाताच्या प्रमाणात वाढ झाली आहे. तसेच या कचऱ्यातून सुटलेल्या दुर्गंधीमुळे ये-जा करणाऱ्या वाहनचालक आणि परिसरात राहणाऱ्या नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. याबाबत नागर पंचतीकडे नागरिकांनी तक्रारी करूनही कारवाई होत नसल्याचा आरोप होत आहे.

सोमवारी रात्री कचराभूमी येथे कोणी अज्ञात व्यक्तीने उंबरगाव रस्त्यावर चिकट पदार्थ टाकल्याने सहा दुचाकींचा घसरून अपघात झाला. त्यामध्ये अनेकांना हातापायांना दुखापत होऊन जखमा झाल्या. रस्त्यावरील कचऱ्यामुळे नागरिकांच्या जीवावर बेतत असल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. तलासरीची एकूण लोकसंख्या १८ हजाराच्या वर असून नगर पंचायत हद्दीत दिवसेंदिवस वाढत चालेल्या रहदारीमुळे दररोज मोठय़ा प्रमाणावर जमणारा ओला आणि सुका कचरा टाकण्यासाठी नगर पंचायतीकडे कचराभूमी नसल्याने कचरा तलासरी-उंबरगाव रस्त्यावर टाकला जात आहे.

कचरा उचलण्यासाठी नगर पंचायातीने सहा घंटागाडीसह, तीन ‘फॉव्‍‌र्हलर’ गाडय़ा आणि सफाई कामगार नेमले असून कचरा उचलण्याचे काम त्यांच्याकडून केले जाते. कामाबाबत नागरिकांमधून तक्रारी असल्या तरी एक दिवसाआड कचरा उचलण्याचे काम कामगारांकडून केले जाते. मात्र घंटागाडीमार्फत उचलून घेतलेला कचरा तलासरी-उंबरगाव रस्त्यावरील स्मशानभूमीजवळ रस्त्यावरच टाकून दिला जात आहे. यामध्ये दगड-मातीबरोबर, हॉटेलमध्ये उरलेले अन्न, हातगाडीवरील खाद्य पदार्थ, खराब भाजीपाला, प्लास्टिक पिशव्या, कोंबडीचे पीस, कर्तनालयातील कापलेले केस, उसाची टाकाऊ चिपाडे व ओला कचरा मोठय़ा प्रमाणात टाकण्यात येतो.

या कचऱ्यातील अन्न पदार्थ खाण्यासाठी भटकी कुत्री, गायी, मोठय़ा प्रमाणात एकत्र जमत असल्याने अपघाताला आमंत्रण मिळत आहे. तर सोमवारी एकाच दिवसात रस्त्यावर सहा दुचाकी घसरून अपघात झाला आहे. कुजलेला भाजीपाला, हॉटेलमधील अन्न पदार्थ, दगड मातीबरोबर उसाची टाकाऊ चिपाडे व कचरा मोठय़ा प्रमाणात टाकण्यात येत आहे. त्यामुळे रस्त्यावरून जाताना दुर्गधी येत असल्याचे वाहनचालकांकडून सांगण्यात येत आहे. याकडे नगर पंचायत व संबंधित विभाग जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा नागरिकांचा आरोप आहे.

नगर पंचायतीकडे कचराभूमीसाठी जागा उपलब्ध नसल्यामुळे अडचणी येत आहेत. नगर पंचायत हद्दीतील वन विभागाची जागा डंपिंग ग्राऊंडसाठी उपलब्ध करून द्यावे यासाठी पत्रव्यवहार आणि पाठपुरावा सुरू आहे. जागा उपलब्ध झाल्यावर डंपिंग ग्राऊंड आणि कचरा प्रक्रिया केंद्र सुरू करण्यात येणार आहे.

– स्मिता वळवी, नगराध्यक्ष तलासरी