scorecardresearch

रेतीची चोरटी वाहतूक

मुंबई अहमदाबाद महामार्गावर तलासरी येथे सूत्रकारजवळ गुजरातमधून रेतीची चोरटी आयात करणारा कंटेनर उलटला.

महामार्गावरील अपघातातून चोरी उघड, प्रशासनाचे साटेलोटे असल्याचा संशय

डहाणू : मुंबई अहमदाबाद महामार्गावर तलासरी येथे सूत्रकारजवळ गुजरातमधून रेतीची चोरटी आयात करणारा कंटेनर उलटला. या अपघातात वाहनचालक जखमी झाला आहे. या अपघाताबरोबरच रेतीची चोरटी वाहतूक होत असल्याचेही उघडकीस आले आहे.  दररोज हजारो ब्रास रेतीचे स्वामित्वधन न देता वाहतूक चालते, परंतु महसूल विभाग आणि पोलीस प्रशासन याविषयी काहीच करत नसल्याने त्यांचे साटेलोटे आहे की काय, अशी शंका व्यक्त केली जात आहे. गुजरातहून महाराष्ट्रात रेती वाहतूक करणारे ट्रक अशाप्रकारे स्वामित्वधन न देता चोरटय़ा मार्गाने रेती वाहतूक करताना दिसतात. मुंबई आणि उपनगरांत ही रेती अनेक मोठय़ा विकासकांकडे जात असल्याचे समजते, परंतु त्याविरुद्ध कोणतीच कारवाई होताना दिसत नाही.

गौणखनिज उत्खननाला बंदी असताना मुंबईला गुजरात, दादरा नगरहवेली आणि राजस्थानहून मुंबई-अहमदाबाद महामार्गाने रेतीचा पुरवठा केला जातो. रेडीमिक्सची बिले दाखवून कंटेनर रेतीचा पुरवठा करतात. मात्र त्यात रेडीमिक्सच्या नावाखाली गौणखनिजाची वाहतूक केली जाते. वरील अपघाताप्रकरणी कासा पोलिसांनी ट्रक जप्त करून चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

मराठीतील सर्व पालघर ( Palghar ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Smuggling sand theft highway accident revealed administration suspected ysh

ताज्या बातम्या