पालघर : पालघर जिल्ह्यला प्राप्त झालेल्या ३० हजार कोव्हिशिल्ड तसेच ९६० कोव्हॅक्सिन लसमात्रा उपलब्ध झाल्याने शनिवार, २१ ऑगस्ट रोजी जिल्ह्यातील महिलांसाठी विशेष लसीकरण मोहीम घेण्याचे जिल्हा प्रशासनाने योजिले आहे.

प्राप्त लशींपैकी निम्म्या लसमात्र वसई विरार महानगरपालिकेला देण्यात आल्या असून जिल्ह्यातील ७६ लसीकरण केंद्रांमध्ये सर्व वयोगटांतील महिलांसाठी पहिल्या व दुसऱ्या लसमात्रेचा लसीकरण कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे. यादरम्यान गरोदर व स्तनदा मातांसाठी ‘ग्रीन कॉरिडोर’च्या माध्यमातून रांगेत न थांबता लस घेण्याचे प्रयोजन करण्यात आले आहे. याखेरीज पालघर तालुक्यातील मनोर, बोईसर या दोन केंद्रांवर तर विक्रमगड तालुक्यातील तलवाडा केंद्रावर कोव्हॅक्सिन लसीकरणाचे सत्र आयोजित करण्यात येत आहे. हे सत्र शनिवारी सकाळी ९ वाजल्यापासून सुरू होणार असल्याचे जिल्हाधिकारी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.  जिल्ह्यत सद्य:स्थितीत आठ लाख ७० हजार लाभार्थ्यांना लसीकरण करण्यात आले असून सहा लाख ४० हजार ८७८ नागरिकांनी लशीची पहिली मात्रा तर दोन लाख २९ हजार ५३४ नागरिकांनी लशीच्या दोन्ही मात्रा घेतल्या आहेत. रक्षाबंधनाचे औचित्य साधून महिलांसाठी विशेष लसीकरण मोहीम जिल्हा प्रशासन राबवत असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ यांनी सांगितले.