squad attacked liquor smugglers Employee injured incident Dahanu ysh 95 | Loksatta

भरारी पथकावर मद्य तस्करांचा हल्ला; डहाणूतील घटनेत कर्मचारी, पंच जखमी

बेकायदा मद्य वाहतुकीवर कारवाईसाठी गेलेल्या डहाणू उत्पादन शुल्काच्या भरारी पथकाच्या वाहनावर मद्य तस्करांनी अपघाती हल्ला केला.

भरारी पथकावर मद्य तस्करांचा हल्ला; डहाणूतील घटनेत कर्मचारी, पंच जखमी
‘उत्पादन शुल्क’च्या भरारी पथकाचे अपघातग्रस्त वाहन.

पालघर : बेकायदा मद्य वाहतुकीवर कारवाईसाठी गेलेल्या डहाणू उत्पादन शुल्काच्या भरारी पथकाच्या वाहनावर मद्य तस्करांनी अपघाती हल्ला केला. या अपघाती हल्ल्यात पथकातील कर्मचारी व पंच यांना  गंभीर दुखापत झाली आहे. तलासरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत उधवा-तलासरी रस्त्यावर गावीतपाडा भागात गुरुवारी रात्री साडेदहाच्या सुमारास मद्य तस्करांनी हा हल्ला  केला.

डहाणू भरारी पथकाकडे जव्हार, मोखाडा, तलासरी विक्रमगड, वाडा तालुक्यांमध्ये बेकायदा मद्य वाहतूक विक्री प्रतिबंध व विभागाशी निगडित इतर संबंधित कामे आहेत. महाराष्ट्र गुजरात राज्य सीमेलगत या भरारी पथकाची नेहमीच गस्ती सुरू असते. शुल्क निरीक्षक धनशेट्टी यांना उधवा तलासरी रस्ता मार्गे महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला परराज्यातील मोठा मद्यसाठा सायमन विष्णू काचरा (रा. आमगाव- तलासरी), विक्रम दीपक राऊत व विनायक कमलाकर बारी (दोन्ही रा. धाकटी डहाणु) या मद्य तस्करांमार्फत पिकअप टेम्पोतून बेकायदा वाहतूक होणार असल्याची माहिती सूत्राद्वारे मिळाली. त्यानुसार धनशेट्टी यांनी भरारी पथकाचे जवान कमलेश सानप, प्रधान राठोड यांच्यासह कारवाई कामी लागणारे पंच विनायक घाडगे व दत्ता लोखंडे यांना कारवाईसाठी सरकारी पोलीस वाहनात सोबत घेतले.

दोन पिकअप टेम्पो कुर्झे गावीतपाडा परिसरातील रस्त्यावर पथकाला आढळले. या दोन वाहनांपैकी एका टेम्पोमध्ये बेकायदा मद्यसाठा होता. हे लक्षात येताच भरारी पथकाने टेम्पोच्या दिशेने त्यांना रोखण्यासाठी पाठलाग केला. त्यावेळी पिकअप चालक भरधाव वेग घेऊन पथकाला चकवा देत होता. पथकाने दोन्ही पिकअपचा पाठलाग करून ती थांबविण्याचा प्रयत्न केला असता, मद्य तस्कर चालकाने पथकाच्या वाहनासमोर पिकअप टेम्पो अडथळा करून जोरदार धडक दिली. या हल्ल्यानंतर भरारी पथकाचे अपघातग्रस्त वाहन रस्त्याच्या बाजूला असलेला एका खड्डय़ात कोसळली.

आरोपी फरार

उत्पादन शुल्क निरीक्षक महेश धनशेट्टी यांनी तलासरी पोलीस ठाण्यात हल्ल्याच्या घटनेची तक्रार नोंद केली असून तिन्ही सराईत मद्य तस्करांवर पोलिसांनी गंभीर गुन्ह्याच्या आरोपाखाली गुन्हे दाखल केले आहे. फरार झालेल्या तिघांचाही शोध सुरू असल्याचे तलासरी पोलीस निरीक्षक अजय वसावे यांनी म्हटले आहे.

मराठीतील सर्व पालघर ( Palghar ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 19-11-2022 at 00:02 IST
Next Story
वनखात्याचे पाणी ‘अडवा’ धोरण; वन प्रशासनाने विरोध केल्याने डाहेतील माती बंधाऱ्याचे काम ३२ वर्षांपासून ठप्प