scorecardresearch

एसटी बस सवलतीमुळे महिला प्रवासी संख्या पाच हजारांनी अधिक, रिक्षा चालकांची उपासमार

राज्य परिवहन मंडळाने महिला प्रवाशांसाठी तिकीट भाडय़ात ५० टक्के सवलत दिल्याने पालघर विभागात महिला प्रवाशांची संख्या सुमारे पाच हजारांनी वाढली आहे.

palghar st womens passengers
(फोटो-लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

पालघर: राज्य परिवहन मंडळाने महिला प्रवाशांसाठी तिकीट भाडय़ात ५० टक्के सवलत दिल्याने पालघर विभागात महिला प्रवाशांची संख्या सुमारे पाच हजारांनी वाढली आहे. असे असले तरी रोख उत्पन्नामध्ये घट झाल्याचे दिसून आले असून  या निर्णयामुळे तीन व सहा आसनी रिक्षा चालकांवर मात्र संकट ओढवले आहे. त्यांची उपासमार सुरू असल्याचे त्यांच्याकडून म्हटले जाते. 

राज्य परिवहन मंडळाने १६ मार्चच्या मध्यरात्रीपासून महिला प्रवाशांकरिता तिकीट भाडय़ात ५० टक्के सवलत दिली आहे. ज्या ठिकाणी खासगी सेवेद्वारे प्रवासाकरिता २० ते ४० रुपये खर्च होत होता, त्या ठिकाणी १० ते १५ रुपयांत एसटी प्रवास  होऊ  लागला आहे.   पालघर विभागातील एसटी बसफेऱ्यांच्या माध्यमातून दररोज एक लाख पाच हजार किलोमीटर इतका प्रवास होत असतो. यामधील भारमान ४६ वरून ५० गुण इतके वाढले असले तरीही यापूर्वी होणारे सुमारे ४२ लाख रुपयांचे रोख उत्पन्न घटून ते ३७ लाख  रुपयांपर्यंत आले आहे. राज्य सरकारकडून मिळणाऱ्या सवलत विचाराधीन घेतल्यास राज्य परिवहन मंडळाचा दैनंदिन दोन लाख रुपयांच्या उत्पन्नात वाढ झाली आहे.

 महिला प्रवाशांनी एसटीच्या बसमधून प्रवास करण्याचे पसंत केल्याने त्याचा रिक्षाचालकांवर मोठा परिणाम झाला आहे. पूर्वी होत असलेल्या जेमतेम ४० टक्के उत्पन्न मिळत असल्याने रिक्षाचालकांसमोर इंधनाचा खर्च, वाहनांची देखभाल दुरुस्ती तसेच बँकेचा हप्ता भरण्याचे संकट उभे राहिले आहे. पालघर- बोईसर या वर्दळीच्या सहा आसनी रिक्षा मार्गावर दैनंदिन धंदा हा जेमतेम ६०० रुपयांवर आल्याचे रिक्षाचालक-मालक संघटनेच्या सदस्यांकडून सांगण्यात येते. वाढलेल्या रिक्षांची संख्या तसेच सीएनजीचा इंधन म्हणून होणारा वापर यामुळे डिझेलवर चालणाऱ्या रिक्षाचालक आणि मालक वर्ग आर्थिक विवंचनेत सापडला आहे.

दुपारच्या सेवा पूर्ववत करा

महिलांसाठी एसटी प्रवासात सवलत दिल्याने दुपारी तसेच कामावर व शिक्षणाच्या जाण्या-येण्याच्या वेळेत बस फेऱ्याचे नव्याने नियोजन करण्याची मागणी पुढे येत आहे. कमी भारमान असलेल्या फेऱ्या एसटीने या पूर्वी बंद केल्या होत्या. त्या पूर्ववत करण्याची मागणी महिला वर्गाकडून करण्यात येत आहे. 

चैत्र उत्सवानिमित्त विशेष बससेवा

चैत्र महिन्यात विविध ठिकाणी आयोजित होणाऱ्या देवींच्या उत्सवानिमित्ताने पालघर विभागाने विविध ठिकाणी एसटीच्या विशेष फेऱ्या नियोजित केले आहेत. पालघर व बोईसर येथून तुळजापूर, श्री सप्तष्टद्धr(२२४)ृंगी देवी तसेच शिर्डीसाठी विशेष फेऱ्या आयोजित केल्या जात असून नालासोपारा, वसई इथून कार्ला येथील श्री एकवीरा देवी दर्शनासाठी बसफेऱ्यांचे आयोजन करण्यात आले आहे. या सुविधेचा महिला प्रवाशांनी लाभ घ्यावा असे राज्य परिवहन मंडळातर्फे आव्हान करण्यात आले असून या माहितीकरिता संबंधित आगारांमध्ये माहिती उपलब्ध असल्याचे सांगण्यात आले.

सीएनजी रिक्षांना फटका

पालघर येथे सीएनजी पंप उभारणीचे काम सुरू असले तरी  सुरू होण्यास काही तांत्रिक अडचणी असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे पालघर, केळवे, सफाळे येथील सीएनजी रिक्षा बोईसर येथे इंधन भरण्यासाठी जात असतात. या प्रवासादरम्यान मार्गावरील प्रवाशांना ते स्वीकारत होते. मात्र आता पालघर बोईसर मार्गावर धावणाऱ्या रिक्षाचालकांवर अतिरिक्त आर्थिक संकट आले आहे.

मराठीतील सर्व पालघर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 29-03-2023 at 00:02 IST

संबंधित बातम्या