पालघर : रेल्वे रुळांवर मोकाट आणि भटक्या जनावरांचा वावर वाढला आहे. त्यामुळे रेल्वेचा अपघात होऊ शकण्याची भीती रेल्वे प्रशासनामार्फत व्यक्त करण्यात येत आहे. या गुरांचा बंदोबस्त करण्यासाठी रेल्वे सुरक्षा दलाने पालघर जिल्ह्यातील रेल्वे रुळालगतच्या गावांना लेखी सूचना दिल्या आहेत. जनावरांना रेल्वे रुळावर येण्यापासून मज्जाव करण्यात यावा असे त्यात प्राधान्याने म्हटले आहे.

पालघर जिल्ह्यातील पालघर, डहाणू व अंशत: तलासरी तालुक्यातून पश्चिम रेल्वेमार्ग जातो. येथे लांब पल्ल्यांच्या रेल्वेसेवेसह रेल्वे मालवाहतूक तसेच स्थानिक रेल्वे सेवा सतत सुरू असतात. रेल्वे मार्गाच्या दुतर्फा संरक्षण भिंत बांधण्याचे प्रस्तावित असले तरी सद्य:स्थितीत त्याचे कोणतेही प्रकारचे काम सुरू नाही.

पालघरच्या बोईसर, उमरोळी, सरावली तसेच डहाणूतील वाणगाव, राई, आंबेमोरा, चिखले, घोलवड, जांबूगाव, पारसपाडा आणि तलासरीतील बोरीगाव या रेल्वे रुळानजीकच्या गावांमध्ये मोकाट गुरे व म्हशी मोठय़ा संख्येने फिरतात. रूळ ओलांडताना काही जनावरे गाडय़ांच्या धक्क्यांनी गंभीर जखमी तसेच मृत्युमुखी पडून रेल्वे सेवेवर परिणाम होतो. या अतिजलद मार्गावर मोकाट जनावरांच्या धडकेत अपघाताची टांगती तलवार असते. त्यामुळे दुर्घटना घडल्यास जीवित आणि वित्तहानी होण्याची भीती रेल्वेकडून व्यक्त करण्यात आली आहे. रेल्वे अपघातात हे मुके प्राणी निष्कारण बळी पडतात. आठवडय़ाला एकतरी अशी घटना घडताना दिसते. एखाद्या वेळी या कळपामुळे मोठा अपघात घडण्याची शक्यता आहे. ती लक्षात घेऊनच रेल्वे प्रशासन दक्ष झाले आहे. रेल्वे सुरक्षा दलाने रुळालगतच्या गावांना सूचनावजा इशारा दिलेला आहे. पशुपालकांनी आपली जनावरे रेल्वे मार्गालगत सोडू नये किंवा गावांनी त्यावर नियंत्रण ठेवावे असेही रेल्वे सुरक्षा दलाने सुचवले आहे.

या पत्राला ग्रामपंचायती कशा प्रकारे प्रतिसाद देतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.