scorecardresearch

संपामुळे ५० टक्के शाळा बंद; आरोग्य सेवा, विकासकामांनाही फटका

दहावी बारावीच्या परीक्षेच्या वेळी शिक्षकांनी काळय़ाफिती लावून परीक्षा केंद्रांवर काम पाहिले.

pg school
शिक्षकांनी संपात सहभाग घेतला आहे. मात्र, दहावीच्या परीक्षेवर परिणाम होऊ नये, यासाठी त्यांनी काळ्याफिती लावून काम केले.

पालघर : राज्य शासकीय व निमशासकीय कर्मचाऱ्यांसह शिक्षण विभागातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी बुधवारी दुसऱ्या दिवशीही संपात सहभाग घेतल्यामुळे जिल्ह्यातील ५० टक्क्यांहून अधिक अनुदानित शाळा बंद होत्या. मात्र, दहावी बारावीच्या परीक्षेच्या वेळी शिक्षकांनी काळय़ाफिती लावून परीक्षा केंद्रांवर काम पाहिले.

प्राथमिक व माध्यमिक विभागाच्या काही अनुदानित शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांना परत माघारी फिरावे लागले. मार्च महिना असल्याने पहिली ते नववीच्या वार्षिक परीक्षा तोंडावर आहेत. हा संप असाच सुरू राहिला तर विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमावर त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. काही शाळांचा अभ्यासक्रम पूर्ण झाला असला तरी, काही शाळांमध्ये अजूनही तो पूर्ण झालेला नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होणार आहे, असे पालकांचे म्हणणे आहे.

जिल्ह्यातील विकासकामे, निधी वितरण, नवीन कामांना मंजुरी, देयके मंजुरी, अर्थसंकल्प, अशी अनेक कामे जिल्हा प्रशासनासह जिल्हा परिषदेत मार्चमध्ये केली जातात. तसेच मार्च हा आर्थिक वर्षांचा अखेरचा महिना असल्यामुळे अनेक कामे असतानाही कर्मचारी संपात सहभागी झाले आहेत. त्यामुळे विकासकामांसह इतर कामे रखडण्याची शक्यता आहे. जिल्हा प्रशासनासह जिल्हा परिषदेच्या लेखा व वित्त विभागावर अतिरिक्त ताण येत आहे.

शेतकऱ्यांच्या कर्जाचा निपटारा मार्चअखेर केला जातो. त्यामुळे तलाठी कार्यालयातून सातबारा घेणे, बोजा काढणे, कर्जासाठी इतर कागदपत्र गोळा करणे, अशी कामे तहसीलदार, मंडळ अधिकारी व तलाठी कार्यालयात केली जातात. त्यासाठी शेतकऱ्यांची गर्दी असते. मात्र, संपामुळे शेतकऱ्यांची कामे खोळंबली आहेत. पालघर जिल्ह्यातील शासकीय आरोग्य संस्थांमध्ये या संपाचा ताण येत आहे. काही संस्थांमध्ये कंत्राटी कर्मचाऱ्यांवर काम केले जात असले तरी रुग्णांना सेवा देताना कसरत करावी लागत आहे. रुग्णालयांचे कार्यालयीन कामकाज ठप्प असल्याचे सांगण्यात आले.

मराठीतील सर्व पालघर ( Palghar ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 16-03-2023 at 00:02 IST