डहाणू : मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरून मनोर, चारोटीपासून ते तलासरी दरम्यान शाळा, तंत्रशिक्षण, महाविद्यालयात जाणाऱ्या शेकडो विद्यार्थ्यांना दररोज खासगी वाहनाने प्रवास करावा लागतो. हा प्रवास अधिक खर्चीक तसेच असुरक्षित आहे. त्यामुळे एसटीच्या बस सुरू करण्याची मागणी विद्यार्थी आणि पालकवर्ग करत आहे. पूर्वी पालघर एसटी आगारातून मनोर, चारोटी, कासामार्गे सुरू असलेल्या बस आता बंद करण्यात आल्या होत्या. त्या पुन्हा सुरू कराव्यात अशी पालकांची मागणी आहे.

चारोटी येथून तलासरीत विद्यार्थ्यांना शाळा, महाविद्यालयात, आयटीआयला जाण्यासाठी सार्वजनिक वाहनव्यवस्थाच नाही. त्यामुळे खासगी वाहनांतून प्रवास करावा लागतो. हा प्रवास असुरक्षित असतो. त्यामुळे चारोटीहून तलासरीला मिनी बस सुरू करण्याची मागणी पालक करत आहेत. पालघर जिल्हा मुख्यालयातून महामार्गावरून तलासरी तालुक्याला जोडणारी बस सुरू केल्यास विद्यार्थी आणि नागरिकांना अधिक सोयीचे ठरेल, असे त्यांचे म्हणणे आहे.

मनोर, चारोटी, येथून तलासरी येथे महामार्गावरून जायचे असल्यास २०-२५किमीचे अंतर कापावे लागते. त्यासाठी खासगी वाहने त्यासाठी दिवसाचे साधारण १००-१५० रुपये घेतात. वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना याच खासगी वाहनांचा पर्याय उरतो. मात्र पालकांना हा रोजचा खर्च झेपत नाही. विशेषत: मुलींच्या बाबतीत या शिक्षणाच्या वाटा अधिकच कठीण होत जातात.

महाविद्यालयाच्या वेळेत डहाणू येथून येणारी बस ही धुंदलवाडी चाररस्ता येथून तलासरीला जाते. तीच बस केवळ चारोटी मार्गे तलासरी अशी चालवल्यास चारोटी, महालक्ष्मी, धानीवरी, आंबोली भागातील महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थ्यांची सोय होईल. मनोर, चिल्हार, चारोटी, कासा, महालक्ष्मी, आंबोली, धुंदलवादी, दापचरी येथून अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी प्रवास करतात. चारोटीहून अगदी मिनी बस जरी सुरू केली तरी विद्यार्थ्यांना भाडे आणि सुरक्षितता या दोन्ही बाबतीत ती परवडू शकेल. स्थानिक लोकप्रतिनिधींनी या प्रश्नाकडे लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.

महामार्गावरून मनोर, चिल्हार, चारोटी, धानीवरी, आंबोली, धुंदलवाडी या भागातून तलासरी येथे शाळेत जाणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे. खासगी वाहनाचा प्रवास विदयार्थ्यांना परवडत नाही. त्यामुळे एसटी महामंडळाने चारोटी-तलासरी बससेवा सुरू करावी. 

— जगदीश मेढा, सामाजिक कार्यकर्ते