नीरज राऊत
१६ एप्रिल २०१३ रोजी पश्चिम रेल्वेची उपनगरीय सेवा डहाणू रोड रेल्वे स्थानकापर्यंत विस्तारित करण्यात आली. २०-२५ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर लोकल सेवा सुरू झाल्याने या भागातील नागरिकांमध्ये उत्साहाचे व आनंदाचे वातावरण पसरले होते. या उपनगरीय रेल्वे सेवेला नऊ वर्षे उलटल्याच्या निमित्ताने अनेक स्थानकांमध्ये या सेवेचे स्वागत करण्यात आले, मात्र उपनगरीय सेवेने या भागातील नागरिकांना नेमका किती लाभ झाला हा वादाचा मुद्दा ठरत आहे.
तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश कलमाडी यांनी विरापर्यंत धावणाऱ्या उपनगरीय सेवा डहाणू रोडपर्यंत विस्तारित करण्याची घोषणा १९९० च्या दशकात केली होती. या भागाचे प्रतिनिधित्व करणारे खासदार राम नाईक यांनी ही सेवा सुरू करण्यासाठी केंद्र सरकारकडे अनेकदा पाठपुरावा केला होता, मात्र वेगवेगळी तांत्रिक कारणे पुढे करून ही सेवा प्रत्यक्षात सुरू होण्यासाठी २०१३ वर्ष उजाडले.
दरम्यानच्या काळात विरार ते डहाणू रोडदरम्यान मोठय़ा प्रमाणात औद्योगिक व नागरिकीकरण वाढल्याने प्रवाशांची संख्या काही पटींनी वाढली होती. उपनगरीय सेवा सुरू झाल्यानंतर येथील प्रवाशांना मेल-एक्सप्रेस गाडय़ांमधून असणारी प्रवास करण्याची मुभा टप्प्याटप्प्याने काढून घेण्याचे प्रयत्न करण्यात आले. या दरम्यान आरक्षित डब्यातून प्रवास करण्यास पासधारकांना मज्जाव करणे, त्यांच्याविरुद्ध दंडात्मक कारवाई करणे व विरोध करण्याऱ्यांविरुद्ध तक्रार दाखल करण्याचे प्रकार घडले.
कालांतराने दैनंदिन प्रवाशांच्या वापरातील अनेक गाडय़ांना सुपरफास्ट दर्जा देण्यात आल्याने त्यामधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना विशेष अधिभार भरण्याची आवश्यकता भासू लागली. तसेच अनेक गाडय़ांचे थांबे रद्द करण्यात येऊन त्यांच्या वेळापत्रकात आमूलाग्र बदल केल्याने अशा गाडय़ा दैनंदिन प्रवाशांच्या सोयीच्या वेळेऐवजी वेगळा वेळांमध्ये धावू लागल्या. त्याचप्रमाणे दैनंदिन प्रवाशांच्या महत्त्वाच्या गाडय़ांमधील प्रथम दर्जाचे डबे तसेच महिलांसाठीच्या डब्यांची संख्या कमी करण्यात आली.
या भागातील प्रवाशांना पूर्वी उपलब्ध असणाऱ्या वेगवेगळय़ा सेवा कमी करताना पश्चिम रेल्वे प्रशासनाने उपनगरीय सेवा सुरू केल्याची सबब पुढे केली असली तरीसुद्धा डहाणू लोकलमध्ये वांद्रे, अंधेरी, बोरिवली व मीरा-भाईदर येथून चढणे सध्या आव्हानात्मक ठरत आहे. शिवाय विरार येथून सुटणाऱ्या डहाणू गाडय़ांमध्ये बहुतांश वेळा बसण्यासाठी जागा मिळणे कठीण होत असते. मुंबईकडे प्रवास करताना बोईसर स्थानकातच लोकल भरली जात असल्याने पालघर, केळवा, सफाळा येथील प्रवाशांना गाडीत उभ्यानेच प्रवास करावा लागतो हा सर्वसाधारण अनुभव आहे.
विरापर्यंत १५ डब्यांच्या गाडय़ा धावत असल्या तरी पुढील काही स्थानकांतील फलाटांची लांबी कमी असल्याचे कारण सांगून या गाडय़ा अजूनही विरारपलीकडे सेवेत कार्यरत केल्या जात नाहीत. एप्रिल २०१३ मध्ये उपनगरीय सेवा सुरू करताना विरार-डहाणूदरम्यान रेल्वे सेवांकरिता दहा रेक उपलब्ध करून देण्याची घोषणा करण्यात आली होती. प्रत्यक्षात २०१८ पर्यंत या भागासाठी फक्त चार तर सध्या सहा रेक उपलब्ध असल्याने उपनगरीय सेवांची संख्या मर्यादित राहिली आहे.
विशेष म्हणजे गर्दीच्या (पिक) वेळेत अपेक्षित प्रमाणात उपनगरीय गाडय़ांचे संख्या नसल्याने प्रवाशांना प्रवास करण्यास अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. याखेरीज एक्सप्रेस, सुपरफास्ट व राजधानी गाडय़ांसाठी अनेकदा उपनगरीय सेवा सायिडगला (बाजूला) काढून ठेवत असल्याने येथील नागरिकांना कामावर पोहोचण्यास सातत्याने विलंब होत असतो. नवीन उपनगरीय सेवा सुरू करण्यासाठी पश्चिम रेल्वे रेक उपलब्धतेचे तसेच रुळावरील गाडी धावण्याची क्षमतेची मर्यादा असल्याची कारणे पुढे आणली जात असली तरी मोकळा असणाऱ्या स्लॉट (वेळे) मध्ये हॉलिडे स्पेशल गाडय़ा व मालवाहू गाडय़ांची सेवा पश्चिाम रेल्वे सोयीस्करपणे चालवत असल्याचे दिसून येते.
डहाणू रोड येथून विरापर्यंत असणाऱ्या सेवा वसई रोड, बोरिवली, अंधेरी किंवा दादपर्यंत विस्तारित करण्याची मागणी पश्चिम रेल्वेने गांभीर्याने घेतली नाही तसेच पनवेल व दिवा येथून वसईपर्यंत येणारी सेवा पालघर किंवा बोईसपर्यंत विस्तारित करण्याच्या मागणीचादेखील विचार झाला नसल्याने या भागातील प्रवाशांना गाडय़ांची कमतरता जाणवत आहे.
पश्चिम रेल्वेच्या विरार-डहाणू रोड चौपदरीकरण प्रकल्पाला आता गती प्राप्त झाली असली तरीही चौपदरीकरण प्रकल्प पूर्ण होण्यास २०२६-२७ उजाडेल असे रेल्वेमधील सूत्रांकडून सांगण्यात येते. या चौपदरीकरणाचा प्रकल्प कार्यान्वित झाल्यानंतर विरार ते डहाणू रोडदरम्यान नवीन १० रेल्वे स्थानकांच्या उभारणीचे प्रस्ताव विचाराधीन केला जाणारा आहे, त्यामुळे वाढणाऱ्या लोकवस्तीच्या अनुषंगाने प्रभावी उपनगरीय सेवा २०३० नंतरच सुरू होईल अशी एकंदर शक्यता आहे.
उपनगरीय क्षेत्र जाहीर केल्यानंतर या भागातील रेल्वे फलाटावरील पायाभूत सुविधांचा स्तर उंचावणे अपेक्षित होते. मात्र एस्केलेटर, पूल, उद्वाहक (लिफ्ट), पिण्याच्या पाण्याची सुविधा, वेटिंग रूम, फलाटांवर सीसीटीव्ही, स्थानकात रुग्णवाहिका सेवा अशा अनेक सुविधा अजूनही उपलब्ध नसल्याचे दिसून आले आहे.
अनेक वर्षांपासून उपनगरीय सेवा सुरू होण्याच्या प्रतीक्षेत असणाऱ्या प्रवासी व नागरिकांना या नऊ वर्षांच्या उपनगरीय सेवेत नेमके काय हाती लागले हा वादाचा मुद्दा ठरत आहे. एकंदर परिस्थितीचा लेखाजोखा केल्यास नागरिकांना लाभ होण्याऐवजी पूर्वापार असणाऱ्या आरामदायी सुविधांपासून वंचित राहून अधिक गर्दीच्या प्रवासाला सामोरे जावे लागले आहे. देशात ‘प्रगती’, ‘विकास’ अशा गोंडस नावाखाली वेगवेगळे प्रयोग राबवले जात असताना पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय सेवेचा डहाणू रोडपर्यंत झालेला विस्तार हादेखील त्यातीलच एक भाग आहे असे म्हणण्याची वेळ येथील प्रवाशांवर येऊन ठेपली आहे.