पालघर : गावांमध्ये स्वच्छतेबाबत जागरूकता वाढावी आणि स्वच्छतेची सवय लागावी या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या ‘स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण २०२५’ या महत्त्वाकांक्षी उपक्रमाला पालघर जिल्ह्यात प्रारंभ झाला आहे. जिल्ह्यातील ४७३ ग्रामपंचायती आणि ८९९ गावांमध्ये स्वच्छतेची तपासणी केंद्रीय पथकाकडून करण्यास सुरुवात झाली असून १५ ऑगस्ट पर्यंत तपासणी पूर्ण होणार आहे.
पालघर जिल्ह्यातील एकूण ८९९ गावांमध्ये केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत स्वच्छता सर्वेक्षणाला सुरुवात झाली आहे. या सर्वेक्षणाद्वारे प्रत्येक गावातील स्वच्छतेच्या पातळीचे मूल्यांकन केले जात असून त्यानुसार त्यांना गुणांकन दिले जाणार आहे. तसेच स्वच्छ व सुंदर गावांना बक्षीस मिळणार आहे. यासाठी १५ ऑगस्ट पर्यंत तपासणी पूर्ण होणार आहे.
स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) टप्पा-2 अंतर्गत देशभरातील ७६१ जिल्ह्यांमध्ये ही स्पर्धा राबविली जात आहे. यामुळे गावांमध्ये स्वच्छतेसाठी चढाओढ निर्माण होईल आणि गावे स्वच्छ व सुंदर बनतील. पालघर जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना स्वच्छतेच्या निकषांची पूर्तता करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
पालघर जिल्ह्यातील सर्व गावांना स्वच्छतेच्या या स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करून बक्षीस जिंकण्याची संधी आहे. १५ ऑगस्ट पर्यंत तपासणी पूर्ण होणार असून, ग्रामपंचायतींना स्वच्छतेच्या सर्व निकषांची पूर्तता करण्यासाठी सक्रिय सहभागाचे आवाहन करण्यात आले आहे. या मोहिमेमुळे पालघर जिल्ह्यातील गावे स्वच्छ, सुंदर आणि निरोगी बनण्याच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकतील, अशी अपेक्षा जिल्हा परिषदे कडून वर्तवण्यात आली आहे.
मूल्यांकनाचे निकष
केंद्रीय पथक गावातील सांडपाणी आणि घनकचरा व्यवस्थापन, प्लास्टिक आणि मैला गाळ व्यवस्थापन, शौचालय सुविधांचा नियमित वापर, हात धुण्याच्या सवयी, ओला-सुका कचऱ्याचे वर्गीकरण, खतखड्डे (कंपोस्ट पीट), तसेच शाळा, अंगणवाड्या, बाजारपेठा, धार्मिक स्थळे आणि सार्वजनिक शौचालयांच्या स्वच्छतेची पाहणी करणार आहे. या सर्व बाबींचे मूल्यमापन १००० गुणांच्या आधारे होणार असून यामध्ये थेट निरीक्षण (१२० गुण), सेवा स्तर प्रगती (२४० गुण), नागरिकांचा अभिप्राय (१०० गुण) आणि गाव भेटीतील स्वच्छता सुविधांचे मूल्यांकन (५४० गुण) यांचा समावेश आहे.
या अभियानामुळे ग्रामीण भागात स्वच्छतेची चळवळ गतिमान होईल. नागरिकांमध्ये स्वच्छतेविषयक सकारात्मक वर्तन बदल घडेल आणि गावे स्वच्छ व सुंदर होऊन नागरिकांचे आरोग्य उंचावेल. – मनोज रानडे, मुख्य कार्यकारी अधिकारी