डहाणू : पालघर जिल्ह्यात ९ ऑगस्ट रोजी जागतिक आदिवासी दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. मात्र याच दिवशी रात्री तलासरी पोलिस ठाणे हद्दीत एका १९ वर्षीय आदिवासी तरुणीवर सामूहिक बलात्कार झाल्याची अत्यंत दुर्दैवी आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. मदतीचा आव आणून काही नराधमांनी तरुणीला निर्जन ठिकाणी नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याने संपूर्ण परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकरणी तलासरी पोलिसांनी जलद हालचाली करत तीन संशयित आरोपींना ताब्यात घेतले असून उर्वरित आरोपींचा शोध सुरू केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित १९ वर्षीय तरुणी हीचे कुटुंबियांशी पटत नसल्यामुळे ही तरुणी गेल्या काही दिवसांपासून आपल्या मैत्रिणीच्या घरी राहत होती. ९ ऑगस्ट रोजी ती तिच्या प्रियकरासोबत दुचाकीवरून शेजारच्या गुजरात राज्यात फिरण्यासाठी गेली होती. दिवसभर फिरल्यानंतर रात्री १० वाजताच्या सुमारास हे दोघे दुचाकीवरून पुन्हा घरी परत येत होते. प्रवासादरम्यान तलासरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत त्यांच्या दुचाकीचा किरकोळ अपघात झाला आणि गाडी रस्त्यावर घसरली.
अपघात झाल्याचे पाहून त्या रस्त्यावरून जाणारे आणि आजूबाजूला उभे असलेले चार ते सहा तरुण त्यांच्या मदतीसाठी पुढे आले. अपघातग्रस्तांना मदत करण्याचे नाटक करत या तरुणांनी परिस्थितीचा गैरफायदा घेत पीडित तरुणीला जबरदस्तीने ओढत आणि फरफटत रस्त्यापासून दूर असलेल्या एका निर्जन स्थळी नेले. प्रियकराने त्यांना विरोध करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याला धमकावून बाजूला करण्यात आले.
निर्जन ठिकाणी नेल्यानंतर पाच जणांनी तरुणीच्या इच्छेविरुद्ध आळीपाळीने तिच्यावर शारीरिक अत्याचार केला. या प्रकारानंतर पीडित तरुणीने थेट तलासरी पोलीस ठाणे गाठले आणि घडलेल्या संपूर्ण प्रकाराबाबत सविस्तर तक्रार दाखल केली. तरुणीच्या तक्रारीवरून पोलिसांनी विविध गंभीर कलमांखाली गुन्हा नोंदवून घेतला आहे.
घटनेची माहिती मिळताच पालघर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांनी स्वतः तलासरी पोलीस ठाण्याला भेट दिली. त्यांनी या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन तपासाची सविस्तर माहिती घेतली आणि तपासाबाबत पोलिसांना आवश्यक त्या सूचना दिल्या. पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवून या गुन्ह्यात सहभागी असलेल्या तीन संशयित आरोपींना ताब्यात घेतले आहे. या घटनेतील इतर आरोपी सध्या फरार असून तलासरी पोलीस त्यांचा कसून शोध घेत आहेत.
