पालघर / डहाणू : प्रेयसीसोबत राहत नसल्याच्या रागातून तलासरी तालुक्यात प्रियकराने प्रेयसीच्या आठ वर्षीय भाच्याचे अपहरण केल्याची घटना उघडकीस आली आहे. सोमवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास मुलगा शाळेत जात असताना त्याचे अपहरण करून रोख रक्कम आणि प्रेयसीला घरी पाठवण्याची मागणी करणाऱ्या आरोपी प्रियकराला जेरबंद करण्यात पोलिसांनी यश आले आहे.
तलासरी तालुक्यातील अनविर येथे राहणाऱ्या एका तरुणीचे राजेश धोडदे या तरुणाशी चार वर्षांपासून प्रेमसंबंध असून, ते दोघेही पती-पत्नीप्रमाणे एकत्र राहत होते. मात्र, लग्नासाठी राजेश तयार होत नसल्यामुळे मोठय़ा बहिणीच्या सांगण्यावरून तरुणीने राजेशसोबत राहण्यास नकार दिला होता. त्यानंतर वारंवार बोलावूनही प्रेयसी आपल्यासोबत राहण्यास नकार देत असल्याच्या रागातून प्रेयसीच्या बहिणीच्या मुलाचे अपहरण केल्याची कबुली राजेशने दिली आहे.
मुलगा सोमवारी सकाळी ९ वाजता शाळेत जात असताना राजेशने त्याचे अपहरण केले. प्रेयसीला व तिच्या बहिणीला याबाबत कळवून रोख रक्कम आणि प्रेयसीला आपल्या घरी पाठवण्याची मागणी राजेशने केली होती. याबाबत मुलाची आई आणि मावशी यांनी तलासरी पोलिसात तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी शोधमोहीम सुरू केली. राजेशने मुलाचे अपहरण करून त्याला दादरा नगर हवेलीमधील खानवेल येथील जंगलात लपवून ठेवले होते. त्याने त्याचा शोध घेणाऱ्या पोलिसांना गुंगारा देण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी संशयित आरोपीच्या फोन लोकेशनवरून त्याला डहाणू तालुक्यातील चारोटी येथे अटक केली. त्याने दिलेल्या माहितीवरून अपहृत मुलाची सुटका केली आहे. याबाबत तलासरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास तलासरी पोलीस करत आहेत.