धरणांच्या तालुक्यात नागरिक तहानलेले स्थानिक आदिवासींची पाण्यासाठी वणवण

जव्हार, मोखाडा, विक्रमगड येथे स्थानिक आदिवासीना दरवर्षीप्रमाणेच पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे.

कासा : जव्हार, मोखाडा, विक्रमगड येथे स्थानिक आदिवासीना दरवर्षीप्रमाणेच पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. या दुर्गम भागात धरणे बांधली आहेत खरी, पण तेथील पाण्याचा फायदा स्थानिकांना होतच नाही. ते पाणी अन्यत्रच वळवले गेले आहेत.
विक्रमगड तालुक्यातील आदिवासी आणि शेतकरी वर्गाच्या सर्वागीण विकासासाठी आदिवासी योजनेतून धामणी आणि कवडास ही धरणे उभारण्यात आली. पण त्यातील पाणी शेतीला कमी आणि औद्योगिक क्षेत्राला राखीव ठेवून वसई-विरारला पुरवले जाते. मुंबई आणि इतर शहरीकरणांमध्ये आरक्षण करून शेतीसाठी आहे तेही पाणी पळवण्याचा घाट घातला जात आहे, असा नागरिकांचा आरोप आहे.
सूर्या प्रकल्पातील धामणी धरणाचे पाणी शेतीला पुरविले जाणार होते, मात्र डहाणूसाठी राखीव असलेले पाणी अन्यत्र वळवले गेले. यामुळे स्थानिक आदिवासींच्या तोंडचे पाणी पळाले आहे.
जिल्हयातील अनेक गाव आणि आदिवासी पाडयांत पाणीसमस्या दरवर्षी कायम आहे. यंदा येथे मान्सून कमी झाल्याने भूजलसाठय़ाची पातळीही खाली गेली आहे. नाले, ओहोळ, विहिरी, कूपनलिका, कोरडी नदीपात्रे यातून पाणी मिळवण्यासाठी आदिवासी जिवाचे रान करताना दिसतात. अनेक ठिकाणी खड्डे खोदून पाण्याचे स्रोत शोधले जात आहेत. गावखेडय़ांतील नैसर्गिक पाणी स्रोत देखभालीविना, दुर्लक्षामुळे कोरडे पडले आहेत, त्यामुळे सर्वच तालुक्यांत तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे.
धामणी धरणात २८१.३१ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा आहे. कवडास धरणाच्या तलावात ९.०६ घनमीटर पाणीसाठा आहे. उजवा तीर कालव्यातून २२५ तर डाव्या कालव्यातुन ४५० घनमीटर पाणी सोडले जाते. कवडास धरणाचे पाणी डहाणुऐवजी बोईसर औद्योगिक वसाहतीसाठी वळविण्यात आले आहे.
एकूण पाहता, ४७.८३५ दशलक्ष घनमीटर पाणी पिण्यासाठी, तर २४३.५५ दशलक्ष घनमीटर पाणी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळासाठी वापरण्यात येत आहे.

मराठीतील सर्व पालघर ( Palghar ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Taluka dams thirsty local tribals are thirsty water palghar kasa amy

Next Story
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढवण वक्तव्याचे पडसाद
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी