पालघर : पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर पर्यटनाचा मोह पर्यटकांच्या जीवावर बेतल्याची घटना तांदुळवाडी किल्ल्यावर घडली. नालासोपारा, विरार आणि डहाणू येथील सहा पर्यटक किल्ल्यावरून परतताना मुसळधार पाऊस, दाट धुके आणि निसरड्या वाटेमुळे वाट चुकले. मात्र, सफाळा पोलिसांनी वेळीच दाखवलेल्या तत्परतेमुळे या सहाही पर्यटकांचे प्राण वाचले आहेत.
०३ जुलै रोजी चार युवक आणि दोन युवती असे सहा पर्यटक तांदुळवाडी किल्ल्यावर फिरण्यासाठी गेले होते. मात्र, डोंगरावरून उतरताना पावसाचा जोर वाढल्याने आणि धुके दाटल्याने त्यांचा रस्ता भरकटला. अशा प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी न घाबरता तातडीने ११२ या आपत्कालीन क्रमांकावर संपर्क साधला. ही माहिती मिळताच सफाळा पोलीस ठाण्याचे पथक तातडीने तांदुळवाडीच्या दिशेने रवाना झाले. स्थानिक पोलीस पाटील सुजित पाटील यांच्याशी समन्वय साधून स्थानिक रेस्क्यू टीमला मदतीसाठी पाचारण करण्यात आले. रेस्क्यू टीमने कठीण हवामानात शोधमोहीम राबवून सर्व सहा पर्यटकांचा शोध घेतला आणि त्यांना सुरक्षितपणे खाली आणले.
विद्यार्थी असल्याचे निष्पन्न
चौकशीदरम्यान हे सर्वजण दांडेकर महाविद्यालयाचे विद्यार्थी असल्याचे समोर आले. पोलिसांनी पालकांशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली आणि विद्यार्थ्यांना पावसाळ्यात दुर्गम भागात फिरताना घ्यावयाची खबरदारी तसेच प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्याबाबत समज दिली. त्यानंतर त्यांना सफाळा रेल्वे स्थानकावर सुरक्षित पोहोचविण्यात आले. या कारवाईमुळे संभाव्य अनर्थ टळला असून, सफाळा पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक होत आहे.
सफाळा पोलिसांचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन
सध्या सुरु असलेला मुसळधार पाऊस, दाट धुके, निसरडे रस्ते, वेगवान पाण्याचा प्रवाह व अचानक बदलणारे हवामान यामुळे तांदुळवाडी धबधबा व किल्ला परिसरात जीवितास गंभीर धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे पावसाळ्यात तांदुळवाडी धबधबा व तांदुळवाडी किल्ल्यावर पर्यटन टाळा. सेल्फी किंवा रील बनविण्याच्या नादात धोकादायक ठिकाणी जाऊ नका. ओढे, धबधबे व वेगाने वाहणाऱ्या पाण्यात उतरू नका. स्थानिक प्रशासनाच्या सूचना व हवामानाचा अंदाज तपासा. एक क्षणाचा निष्काळजीपणा आयुष्यभराची हानी ठरू शकतो.आपला जीव अमूल्य आहे. सुरक्षित राहा, जबाबदार नागरिक बना.
सफाळा पोलीस ठाणे –आपत्कालीन मदत क्रमांक: ११२संपर्क: ८६६९६०४०३७
