देशातील पहिली अणुभट्टी तारापूर येथे १९६९ पासून कार्यरत झाली. या अणुऊर्जा प्रकल्पाच्या उभारणीपासून हा प्रकल्प ५५ वर्षांपेक्षा अधिक काळ सुरू ठेवण्यासाठी अनेक समस्यांना सामोरे जावे लागले. प्रकल्प सुरू होईपर्यंत अमेरिकी तंत्रज्ञ व नंतर स्वदेशी तंत्रज्ञान व मनुष्यबाळाच्या आधारे या अनुभट्ट्या सुरू ठेवण्याची किमया देशातील शास्त्रज्ञांनी दाखविली आहे. दुरुस्तीसाठी अशक्यप्रिय बाबी या पुनरुज्जीवन उपक्रमाद्वारे करून न्यूक्लिअर पॉवर कार्पोरेशन ऑफ इंडियाच्या शास्त्रज्ञाने प्रशंसनीय कामगिरी केली आहे.

उकळत्या पाण्यावर वाफ निर्मिती करून अणुऊर्जा निर्मिती करणारा बोईलींग वॉटर रिऍक्टर तंत्रज्ञानाचे अनुभट्टी तारापूर मध्ये उभारण्याची भारत सरकारने निश्चित केले. जनरल इलेक्ट्रिक व बॅक्टेल या अमेरिकी कंपन्यांच्या मदतीने ही उभारणी चे काम १९६१ पासून हाती घेण्यात आली. देशातील पहिल्या अणुभट्ट्या उभारताना अवजड असणाऱ्या अणुभट्ट्या (प्रेशर वेसेल) अमेरिकेहुन आणण्यासाठी सुसज्ज जेट्टी ची उभारणी करणे, वाफेला थंड करण्यासाठी असणाऱ्या शीतकरण प्रणाली व विद्युत इन्सुलेशन स्थानिक वातावरणाशे सुसांगत पद्धतीने विकसित करणे.

स्थानिक तांत्रिक कौशल्य उपलब्ध नसताना न्यूक्लिअर प्रणालीत अपेक्षित वेल्डिंग कौशल्य व किरणोत्सर्ग क्षेत्रात संसर्ग टाळण्यासाठी सुरक्षितता राखणे हे आव्हानात्मक ठरले. ऑक्टोबर १९६९ मध्ये या अणुभट्ट्यांमधून प्रत्येकी २१० मेगा वॉट वीज उत्पादन सुरू झाले.सन १७७४ मध्ये भारताने पहिली शांततापूर्ण अणु चाचणी केल्यानंतर अमेरिकेने भारतावर अनेक निर्बंध लादले त्यामध्ये तारापूर अणुऊर्जा केंद्र १ व २ करिता लागणारे समृद्ध युरेनियमचा पुरवठा बंद केला.

एकी कडे इतर देशांकडून समृद्ध युरेनियम मिळवण्यासाठी धडपड सुरू असताना भाभा अनु संशोधन केंद्राने त्याच सुमारास मिक्स ऑक्साईड अर्थात मॉक्स अणु इंधन विकसित केले.उच्च तापमान व किरणोत्सर्ग वातावरणात स्टेनलेस स्टील पाईप मध्ये भेगा पडण्याच्या घटना घडत असत. त्यात १९८० च्या सुमारास सेकंडरी स्टीम जनरेटर मध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने या दोन अणुभट्ट्यांमधून उत्पादन १६० मेगा वॉट इतके कमी करण्यात आले.

जपान मध्ये आलेल्या मोठ्या मोठ्या भूकंपानंतर फुकुशिमा अणुऊर्जा केंद्रात निर्माण झालेल्या आपत्ती परिस्थिती नंतर अणुऊर्जा नियामक मंडळाने तारापूरच्या अणुभट्ट्यांमध्ये व्यापक भूकंपीय मजबुतीकरण करण्याचे सूचित केले होते. स्वदेशी तंत्रज्ञानातून या दोन अणुभट्ट्या चालवण्यासाठी सामोरे येणाऱ्या अडचणी सोडवत अणुऊर्जा निर्मिती दरम्यान तयार होणाऱ्या अनेक कचऱ्याचे व्यवस्थापन प्रभावीपणे केले जात आहे.

तारापूर अणुऊर्जा केंद्रात जानेवारी २०२० दरम्यानअनुभट्टी १ ची नियमित तपासणी करण्यादरम्यान निरीक्षण केले जात असताना प्राथमिक पुनर्संचरण लुप अर्थात रिसर्क्युलेशन पायपिंग चा दर्जा खालावल्या चे निदर्शनास आले. किरणोत्सर्ग असणाऱ्या क्षेत्रामध्ये ऑस्ट्रेनिटीक स्टीलच्या वेल्डिंग जॉईंटमध्ये आंतरकणीय तणाव गंज क्रॅकिंग अर्थात इंटरग्रॅन्युलर स्ट्रेस करोजन क्रॅकिंगमुळे भेगा पडल्याचे निदान झाले.

काही महिन्यांनी जुलै २०२० मध्ये अनुभट्टी क्रमांक २ मध्ये देखील अशाच प्रकारच्या पाईपचा दर्जा असमाधानकारक असल्याचे दिसून आले. तारापूर येथे ऑक्टोबर १९६९ मध्ये सुरू झालेल्या देशातील पहिल्या अणुऊर्जा प्रकल्पाच्या प्राथमिक पुनर्संचरण लूपच्या पाईपलाईनचा दर्जा खालावल्याने ते बदली करण्याचे आव्हान एनपीसीआयएल समोर उभे राहिले होते. तारापूर १ व २ या अणुभट्टींचे किमान १० वर्ष आयुर्मान शिल्लक असून देशाला असणारी विजेची गरज लक्षात घेता या दोन अणुभट्ट्यांचे पुनरुज्जीवन करण्याचा निर्णय घेण्यात आला.

या दोन्ही अनुभट्ट्या मधून विजेचे उत्पादन बंद करून प्राथमिक पुनर्संचरण लूपची बदली करण्याचा शुभारे साडेतीनशे कोटी रुपयांचा खर्च असणारा प्रकल्प हाती घेण्यात आला.किरणोत्सर्ग भागामध्ये पाईपलाईन बदलताना सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून तंत्रज्ञान विकसित करणे, कुशल मनुष्यबळ तयार करणे तसेच विशिष्ट दर्जाचे व अमानक आकाराचे स्टेनलेस स्टील पाईप इटली मधून उत्पादित करून घेणे हे आव्हानात्मक ठरले. त्यामुळे प्रकल्प संपवण्याचे प्राथमिक उद्दिष्ट असणारा कालावधी सुमारे दोन वर्षांनी पुढे गेला.

तरी देखील भारतीय तंत्रज्ञ व शास्त्रज्ञाने आव्हानात्मक व कठीण दिसणारा या प्रकल्पातील अनुभट्टी १ पुनरुज्जीवन करण्याचे काम ऑक्टोबर २०२५ मध्ये पूर्ण केले. त्यानंतर अणुऊर्जा नियामक मंडळाच्या नेमून दिलेल्या मार्गदर्शक सूचना तसेच अटी – शर्तींचे अनुपालन करत २९ जानेवारी २०२६ रोजी या अनुभट्टीमध्ये अणुऊर्जा उत्पादन पुन्हा सुरू करण्यात आले. एका लहान तांत्रिक अडचणीमुळे काही काळ उत्पादन बंद ठेवण्यात आल्यानंतर ५ फेब्रुवारी रोजी तारापूर ची अनुभट्टी एक कार्यरत झाली आहे.

अनुभट्टी दोन च्या दुरुस्तीच्या व पुनरुज्जीवन करण्याचे काम पूर्ण झाले असून अणुऊर्जा या मंडळाकडून आवश्यक परवानगी प्राप्त झाल्यानंतर त्यामधून देखील वीज उत्पादन सुरू होणार आहे. देशात सर्वात जुन्या असणाऱ्या अणुभट्ट्यांमधून राज्यासह महाराष्ट्र व मध्य प्रदेश राज्यांना सध्या २.४१ रुपये प्रति युनिट इतक्या माफक दराने वीजपुरवठा होत असून तारापूर येथील या दोन अनुभट्ट्या देशाच्या आत्मनिर्भरतेचे प्रतिक ठरले आहे.

जगभरात अशा प्रकारचे कार्यरत असणाऱ्या फक्त दोनच अणुभट्ट्या असून त्यांचे पुनरुज्जीवन होत असल्याने देशासाठी अभिमानाची बाब ठरली आहे. याबरोबरीने सन २००५ मध्ये प्रेशराईज हेवी वॉटर रिॲक्टर पद्धतीच्या प्रत्येकी दोन ५४० मेगा वॉट अणुभट्ट्यांच्या (३ व ४) कार्यरत झाल्या असून तारापूर येथे १४०० मेगा वॉट वीज उत्पादन करण्याची क्षमता कार्यरत आहे.

अणुभट्टी पुनरुज्जीवन काळात आणखी काय करण्यात आले ?

तारापूर अणुऊर्जा केंद्र चालविण्यासाठी (ऑपरेशन्स) सुमारे २५ प्रशिक्षित अधिकारी कर्मचारी असून त्यांना या शटडाउनच्या काळात वेगवेगळ्या प्रकारचे प्रशिक्षण देऊन त्यांच्या परवान्याचे अणुऊर्जा नियमक मंडळाकडून पुनर्प्राप्ती (रिलायसन्स) करून घेण्यात आले आहे. त्याचप्रमाणे अनेक सुरक्षा संबंधित व दैनंदिन कामकाजाशी संबंधित प्रणालींमध्ये दर्जा वृद्धीकरण करण्याचे काम हाती घेण्यात आले होते. सहा वर्षाच्या खंडानंतर तारापूर अणुभट्टी १ व २ मधून वीज निर्मिती पुन्हा सुरू होताना पुढील काही वर्ष या अणुभट्ट्यांमधून अखंड वीज उत्पादन सुरु राहणासाठी पूर्व तयारी या कालावधीत करण्यात अली.

तारापूर अणुभट्ट्यांचे पुनरुज्जीवन प्रकल्प कसा राबविण्यात आला ?

तारापूर १ व २ अणुभट्ट्यांचे पुनरुज्जीवन करण्यासाठी आवश्यक तंत्रज्ञान, किरणोत्सर्ग भागात काम करण्यासाठी कुशल मनुष्यबळ व उपकरणांची उपलब्धता, विशिष्ट दर्जाचे पाईप व इतर जोडणारे साहित्य मिळविणे व काम करण्यासाठी सक्षम ठेकेदार नेमणे हे आव्हानात्मक व वेळ घेणारे होते. कोर (CORE) इंजीनियरिंग कंपनीच्या माध्यमातून प्राथमिक पुनर्संचरण लूपच्या ओस्टेनिटीक स्टील धातूचे पाईप बदलण्यासाठी सुमारे ३५० कोटी रुपये व इतर उपकरणे व साहित्य बदलण्यासाठी १०० कोटी रुपये खर्च करण्यात आले. अणुभट्टी पुनरुज्जीवित करण्याचा हा प्रकल्प सुमारे दोन वर्षांपूर्वी संपवण्याचा प्रयत्न होता. मात्र ऑस्टेनिटीक स्टीलच्या वेगवेगळ्या व अमानक आकाराच्या जलवाहिनी इटली देशामधून उपलब्ध होण्यास विलंब झाल्याने प्रकल्पाला विलंब झाला.