तारापूर येथे २ मार्च रोजी ओलियम या रसायनाची गळती तब्बल पाच तास सुरू राहिली होती. त्यामुळे औद्योगिक वसाहतीच्या पूर्वेकडील भागात सल्फर ट्रायऑक्साईड व इतर गंधकयुक्त घनदाट वायूने दाटून टाकले. परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शासकीय तसेच उद्योजकांचे सुरक्षाविषयक तज्ञ पथक कुचकामी ठरले. तसेच शासनाचा आपत्कालीन आराखडा देखील कागदावरच राहिल्याचे निदर्शनास आले. नागरिकांचे व प्रशासनाचे नशीब बलवान असल्याने सुदैवाने कोणतीही अप्रिय घटना या दुर्घटनेदरम्यान घडली नाही.
तारापूर औद्योगिक वसाहती मधील भगेरिया इंडस्ट्रीज लिमिटेड या उद्योगात दुपारी पावणेदोन वाजताच्या सुमारास ओलियमचा दैनंदिन साठा करणाऱ्या टाकींचा आधार निकामी झाल्याने सुमारे १२०० लिटर ओलियम असणाऱ्या टाक्या कलंडल्या. परिणामी या टाक्यांना जोडले गेलेले नोझल तुटल्याने त्यामधून गळती सुरू झाली. टाक्यांमधून वाहणारे ओलियम हवेच्या संपर्कात आल्यानंतर त्याची प्राणवायू सोबत अभिक्रिया होऊन धोक्याप्रमाणे घनदाट व घातक गंधकयुक्त वायूंची निर्मिती होण्यास सुरूवात झाली. वाऱ्याच्या आग्नेय दिशेप्रमाणे हा वायू औद्योगिक वसाहतीच्या पूर्वेच्या भागात पसरत गेला. या वायूमुळे दृश्यमानावर परिणाम झाला तसेच विषारी वायूच्या गुणधर्मामुळे त्वचा, डोळे, घशाला खवखवणे, मळमळने तसेच अस्वस्थ वाटायला सुरुवात झाली.
ओलियम साठवणूक करणाऱ्या टाकी परिसरातील रचना व घनदाट वायूमुळे गळतीच्या ठिकाणापर्यंत पोहोचणे व गळती रोखण्यासाठी प्लग करणे किंवा तत्सम व्यवस्था करणे शक्य झाले नाही. अखेर टाकीमधील सर्व ओलियमची गळती झाली व खाली निचरा झालेल्या ओलियमची अभिक्रिया बंद होण्यासाठी पाच तासांचा अवधी लागला. तोपर्यंत सुमारे साडेतीन हजार नागरिक, विद्यार्थी व कर्मचाऱ्यांना हंगामी स्थलांतर करण्यात आले होते. मात्र या दुर्घटनेमुळे झालेल्या वायू प्रदूषणाची झळ १० हजार व्यक्तींना बसल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
तारापूर येथे १४०० उद्योग असून त्यामध्ये रासायनिक कारखान्याची संख्या लक्षणीय आहे. या परिसरात अधून मधून अपघात होत असतात. तसेच इस्पात (भंगार पासून लोह, स्टील उत्पादन करणाऱ्या) उद्योगांमधून अशाच प्रकारचा घनदाट वायू नेहमीच सोडण्यात येत असतो. त्यामुळे भगेरिया केमिकलच्या दुर्घटनेनंतर निर्मिती झालेल्या वायू उत्पत्तीकडे अनेकांनी प्रथम गांभीर्याने बघितले नाही.
दुर्घटना घडून दोन तास उलटल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात येत नसल्याने तसेच गंधक युक्त वायूंची उत्पत्ती सुरूच राहिल्याने वाऱ्याच्या दिशेच्या अनुषंगाने बाधित कारखान्यांमधील तसेच शाळांमधील विद्यार्थ्यांना घरी सोडून देणे किंवा इतरत्र हंगामी स्थलांतर करण्यासाठी प्रशासनाने सूचना दिल्या. मात्र आपत्कालीन परिस्थिती सूचित करण्यासाठी प्रत्येक उद्योगात (किमान मध्यम व मोठ्या उद्योगांमध्ये) असलेली सायरन व्यवस्था वापरण्यास यंत्रणा कुचकामी ठरली. त्यामुळे आपत्कालीन परिस्थितीत विश्वसनीय माहिती मिळणे किंवा शासकीय विभागांकडून संबंधित उद्योगाला सूचित करायला ई-मेलचा पर्याय निवडावा लागला. ई-मेल प्राप्त झाल्यानंतर देखील त्यावर अंमल करण्यास अनेक उद्योगांकडून विलंब झाला. आपत्कालीन परिस्थितीत देखील आपल्या कर्मचाऱ्यांचे स्वास्थ्य आरोग्य व जीवापेक्षा कंपनीमध्ये सुरू असणारे उत्पादन व त्याची किंमत अधिक असल्याची उद्योजकांची दुर्बल व व्यावसायिक मानसिकता दिसून आली.
घातक रसायनांची हाताळणी करणाऱ्या उद्योगांची दरवर्षी तपासणी केली जात असल्याचा टेंबा औद्योगिक सुरक्षा विभागाकडून मिरवला जातो. अशा परिस्थितीत ज्या लोखंडी आधारावर टाक्या बसवण्यात आल्या ते आधार आम्लयुक्त वातावरणात गंजून कमकुवत होईपर्यंत त्याकडे लक्ष का दिले गेले नाही हा प्रश्न देखील निरुत्तरित राहतो. शिवाय ओलियम किंवा इतर आम्ल रसायनाच्या गळती दरम्यान त्यावर पाणी मारण्याऐवजी माती शिंपडण्याची व्यवस्था या नामांकित कंपनीमध्ये पुरेशा प्रमाणात नसल्याचे देखील दुर्घटनेच्या समयी दिसून आले. या पार्श्वभूमीवर सुरक्षा विभागाकडून यापूर्वी केलेली तपासणी व निरीक्षणे ही फक्त कागदपत्रे पूर्तता करण्यासाठीच राहिल्याचे दिसून आले आहे.
औद्योगिक सुरक्षा विभागाने गेल्या वर्षभरात तारापूर परिसरात २८८ मॉक ड्रिल अर्थात लुटुपुटूच्या कवायती केल्याचा दावा सुरक्षा सप्ताह दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात केला. आपत्कालीन परिस्थिती दरम्यान करावयाच्या कारवाई संदर्भात इतका सराव झाला असताना उद्योग तसेच विविध यंत्रणेमध्ये दिसून आलेला समन्वयाचा अभाव, नागरिकांमध्ये निर्माण झालेला संभ्रम दूर करण्यासाठी उद्घोषणा किंवा तातडीने प्रसिद्धीपत्रक जारी करणे किंवा तत्सम माहिती देण्यास यंत्रणे समोरील दिसून आलेली मर्यादा पाहता यामधील कारणांचा स्वतंत्रपणे सखोल अभ्यास करणे गरजेचे ठरणार आहे. घातक रसायने हाताळणाऱ्या उद्योगांमध्ये असणाऱ्या रासायनिक साठ्याचा तपशील व त्याच्या गळती दरम्यान करावयाची प्रतिबंधात्मक उपाययोजना यासंदर्भात माहिती देखील अनेक लगतच्या उद्योगांमधील कर्मचाऱ्यांना नसल्याचे याप्रसंगी दिसून आले. ओलियमच्या गळती नंतर नेमके गळती होणाऱ्या टाकीमध्ये घातक रसायनांचा किती साठा होता याबद्दल देखील गळतीच्या कार्यकाळात वेगवेगळे आकडे पुढे आले होते.
ओलियम गळतीनंतर उद्भवलेली परिस्थिती हाताळतांना प्रशासकीय यंत्रणेची दमछाक झाली. किंबहुना होणारी गळती रोखण्यास व त्यावर उपाययोजना करण्यास हतबलता व मर्यादा दिसून आल्या. सुदैवाने या दुर्घटनेत कोणीही गंभीर आजारी झाले नाही किंवा दुखापत झाली नाही. मात्र यंत्रणेला आपत्कालीन परिस्थितीमध्ये करावयाच्या उपाययोजनांसंदर्भात असलेली अभिज्ञता व तयारीचा व समन्वयाच्या अभाव स्पष्ट झाल्याने ही दुर्घटना आपत्कालीन व्यवस्थेची परीक्षा ठरली. या घटनेमधून जिल्हा प्रशासन तसेच शासनाचे संबंधित विभागाने एकत्रित काम करण्यासाठी चिंतन मनन करण्याची गरज निर्माण झाली आहे.
तारापूर येथील उद्योगांपासून अवघ्या सहा – आठ किलोमीटर अंतरावर तारापूर अणुऊर्जा केंद्र वसलेले असून या ठिकाणी देखील आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास करावयाच्या उपायोजनांसंदर्भात कालांतराने मॉक ड्रिलचे आयोजन केले जाते. अशा दुर्घटना रोखण्यासाठी यंत्रणा सक्षम असली तरी देखील दुर्घटना समयी लोकांपर्यंत माहिती व उपाययोजना संदर्भात तपशील पोहोचवण्यासाठी यंत्रणेची उभारणी करणे गरजेचे झाले आहे. अनेकदा मॉक ड्रिल सारख्या उपाययोजना कागदोपत्री व औपचारिकता पूर्ततेसाठी करण्यात येत असून त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने विविध क्षेत्रातील अधिकारी, कर्मचारी, कामगार, प्रतिनिधी यांचे त्यामधील इनवॉलमेन्ट ठेवणे देखील गरजेचे झाले आहेत.
