बोईसर : तारापूर औद्योगिक क्षेत्रातील एका रासायनिक कारखान्यातून वायुगळती होऊ लागल्याने काही काळ परिसरात घबराट निर्माण झाली. वायुगळती सुरू होताच कारखान्यातील सर्व कामगारांना वेळीच बाहेर काढल्याने मोठा अनर्थ टळला. वायुगळतीची माहिती मिळताच बोईसर पोलीस आणि तारापूर अग्निशमन दल तातडीने घटनास्थळी पोचले असून वायुगळतीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती अग्निशमन अधिकारी यांनी दिली.

तारापूर औद्योगिक क्षेत्रातील प्लॉट क्रमांक डब्ल्यू-८२/ए वरील श्री विनायक केमेक्स या रासायनिक कारखान्यातील उत्पादन प्रक्रिया विभागात बुधवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास अचानक क्लोरीन या वायूची गळती सुरू झाली. वायुगळतीमुळे कारखान्यामधील कार्यरत कर्मचारी आणि कामगार यांना तीव्र दुर्गंधीचा त्रास सुरू झाल्याने सर्व कर्मचारी आणि कामगार यांना तातडीने कारखाना परिसराच्या बाहेर सुरक्षितपणे काढण्यात आले.

वायु गळतीची माहिती मिळाल्यानंतर तारापूर अग्निशमन दल आणि बोईसर पोलीस तातडीने घटनास्थळी पोहोचले. अग्निशमन दलाने जवळपास दीड ते दोन तासांच्या प्रयत्नानंतर वायु गळती बंद करण्यात यश मिळवले. क्लोरीन वायू हवेमध्ये पसरल्यामुळे आजूबाजूच्या कारखान्यांमधील कामगार आणि नागरिकांना दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत असून पोलिसांनी कारखाना परिसरात प्रवेश करण्यास प्रतिबंध लागू केला आहे.

तारापूर औद्योगिक क्षेत्रातील प्रमुख अपघात :

आशिया खंडातील सर्वात मोठी औद्योगिक वसाहत म्हणून ओळख असलेल्या तारापूर औद्योगिक क्षेत्रात वाढत्या अपघाती घटनांचा प्रश्न गंभीर बनला आहे. गेल्या पाच वर्षात औद्योगिक क्षेत्रातील कारखान्यांमध्ये ९१ अपघात नोंदवले गेले असून यामध्ये ४८ कामगारांचा बळी गेला आहे तर ९० कामगार गंभीर जखमी झाले आहेत.

मेडली फार्मास्युटिकल्स, ऑगस्ट २०२५:  ४ कामगारांचा मृत्यू आणि २  गंभीर जखमी

तारा नायट्रेट कंपनी, जानेवारी २०२०: ७ कामगारांचा मृत्यू आणि ७ गंभीर जखमी. 

रिस्पॉन्सिव्ह कंपनी, ३१ ऑक्टोबर २०२५ :  यंत्रामध्ये बिघाड होऊन लागलेल्या आगीमुळे तीन कामगार गंभीररिता भाजले. त्यापैकी रुग्णालयात उपचार सुरू असताना दोन कामगारांचा मृत्यू