पालघर : देशातील सध्या परिस्थिती लक्षात घेता हवाई मार्गे शत्रू हल्ला झाल्यास नागरिकांच्या सुरक्षिततेच दृष्टिकोनातून सज्जता राखण्यासाठी तसेच अशा परिस्थितीत विविध शासकीय विभागात असलेल्या समन्वयाचा सराव करण्याच्या दृष्टीने देशभरात उद्या (७ मे रोजी) रंगीत तालीम अर्थात मॉक ड्रिल चे आयोजन करण्यात आले आहे. सालवाड (बोईसर) ग्रामपंचायत हद्दीत तारापूर अणुऊर्जा केंद्राच्या कर्मचारी वसाहती समोरील विजय कॉलनी येथील मोकळ्या मैदानात रंगीत तालीम व प्रात्यक्षिक आयोजित केले जाणार आहे.

महाराष्ट्र राज्यातील १६ ठिकाणी मॉक ड्रिल करण्यात येणार आहे. केंद्र सरकारकडून या १६ ठिकाणांचे तीन प्रकारे श्रेणींमध्ये वर्गीकरण आले आहे असून मुंबई, उरण व तारापूर ही तीन ठिकाणे अतिसंवेदनशील असल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्याचबरोबरीने ठाणे, पुणे, नाशिक, रोहा- नागोठणे, मनमाड, सिन्नर, पिंपरी- चिंचवड व थळ-वायशेत ही ठिकाणे संवेदनशील असल्याचे घोषित करण्यात आली आहेत.

या खेरीज औरंगाबाद, भुसावळ, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या ठिकाणी देखील रंगीत तालीम (मॉक ड्रिल) घेण्यात येणार आहेत. उद्या आयोजित केल्या जाणाऱ्या नागरी संरक्षण सरावाचे उद्दिष्ट नागरी संरक्षण दलाच्या विविध उपायांच्या प्रत्यक्षात अमलबजावणी करताना परिणामकारकता आणि समन्वयाचे मूल्यांकन करणे असल्याचे याविषयी गृहमंत्रालयाने राज्यांना मॉकट्रिल करण्याबाबत जारी केलेल्या पत्रकात नमूद केले आहे.

विजयनगर मैदानावर होणार मॉक ड्रिल

तारापूर अणुऊर्जा केंद्राच्या समोर असणाऱ्या विजयनगर कॉलनी च्य मैदानावर उद्या (ता ७ रोजी) दुपारी चार वाजल्याच्या सुमारास या रंगीत तालीमेचे आयोजन करण्यात येणार असून राज्य सरकारकडून हवाई हल्ला होण्याचे संकेत प्राप्त झाल्यानंतर या मॉक ड्रिलला आरंभ होईल. या मॉक ड्रिल दरम्यान नागरी संरक्षण दलाचे वॉर्डन व स्वयंसेवक, होमगार्ड, राष्ट्रीय छात्र सेना (एनसीसी) व राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) चे छात्र तसेच महाविद्यालयीन विद्यार्थी सहभागी होणे अपेक्षित आहे. याखेरीज महसूल, पोलीस, आरोग्य (शल्य चिकित्सक), आपत्ती व्यवस्थापन, अग्निशमन दल, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ) व इतर शासकीय विभाग या रंगीत तालीम मध्ये सहभागी होतील असे नागरी संरक्षण दलाच्या कार्यालयातून सांगण्यात आले.

१४ मे रोजी होणार स्वतंत्र मॉक ड्रिल

राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने १४ मे रोजी तारापूर अणुऊर्जा प्रकल्पाच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून रंगीत तालमीचे आयोजन करण्यात आले आहे. तारापूर अणुऊर्जा केंद्रात आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास करावयाच्या कारवाईचा सराव तसेच अशा परिस्थितीत विविध शासकीय विभागांचा समन्वय तपासण्याच्या दृष्टीने ही रंगीत तालीम स्वतंत्रपणे नंतर आयोजित केली जाणार आहे.

मॉक ड्रिलची उद्दिष्टे

  • हवाई हल्ल्याची चेतावणी देणाऱ्या प्रणालींच्या प्रभावीतेचे मूल्यांकन करणे.
  • भारतीय हवाई दलाशी हॉटलाइन, रेडिओ कम्युनिकेशन लिंक्सचे कार्यान्वित करणे.
  • कंट्रोल रूम आणि शॅडो कंट्रोल रूमची कार्यक्षमता तपासणे.
  • शत्रूंच्या हल्ल्यात स्वतःचे संरक्षण करण्यासाठी नागरी संरक्षण पैलूंवर नागरिक, विद्यार्थी इत्यादींना प्रशिक्षण देणे.
  • क्रॅश ब्लॅकआउट उपायांची तरतूद करणे.
  • महत्वाच्या वनस्पती, स्थापनांच्या लवकर छद्मवेशासाठी (camouflage – कॅमोफ्लोगिंग) तरतूद करणे.
  • वॉर्डन सेवा, अग्निशमन, बचाव कार्य आणि डेपो व्यवस्थापन यासह नागरी संरक्षण सेवांची सक्रियता आणि प्रतिसाद पडताळणे.
  • क्रॅश ब्लॅकआउट उपायांच्या अंमलबजावणीचे मूल्यांकन करणे.
  • निर्वासन योजनांची तयारी आणि त्यांच्या अंमलबजावणीचे मूल्यांकन करणे.