बोईसर : तारापूर ग्रामपंचायतीच्या महिला सरपंचांना पदावरून दूर करण्यात आले आहे. व्यावसायिक दाखल्यासाठी लाच स्वीकारताना त्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून रंगेहात पकडून अटक करण्यात आली होती. याप्रकरणी कोकण विभागीय आयुक्त यांच्या आदेशावरून पदावरून दूर करण्याची कारवाई करण्यात आली आहे.

तारापूर ग्रामपंचायतीच्या तत्कालीन सरपंच संध्या पागधरे यांना १४ मे रोजी व्यावसायिक दाखला देण्यासाठी तक्रारदाराकडून पाच हजार रुपये लाचेची रक्कम स्वीकारताना पालघर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडण्याची कारवाई केली होती. त्यांच्या विरोधात तारापूर पोलीस ठाणे येथे लाचलुचपत प्रतिबंधक अधिनियम (सुधारित २०१८) चे कलम ७ नुसार गुन्हा दाखल करून त्याच दिवशी अटक करण्यात आली. याप्रकरणी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५९ चे कलम ३९(१) नुसार पदावरून दूर करण्याच्या शिफारशीचा प्रस्ताव पालघर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी विभागीय आयुक्त कोकण विभाग कार्यालयाकडे सादर केला होता. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांचा चौकशी अहवाल, कोकण विभागीय आयुक्त यांच्यासमोरील दूरदृश्य प्रणालीद्वारे घेण्यात आलेली मौखिक सुनावणी व आरोपी महिला सरपंच यांच्यावतीने त्यांच्या वकिलाने सादर केलेले लेखी म्हणणे यांचे अवलोकन करण्यात आले.

संध्या पागधरे यांनी तारापूर ग्रामपंचातीच्या सरपंच म्हणून आपली जबाबदारी व कर्तव्य पार पडताना लाचेची रक्कम स्वीकारून गैरवर्तवणूक आणि लांछनास्पद वर्तवणूक केल्याचे विभागीय आयुक्त यांनी चौकशीमध्ये निष्कर्ष काढला असून सरपंच पागधरे यांना महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५९ चे कलम ३९(१) नुसार पदावरून दूर करण्याचा आदेश जारी करण्यात आला आहे.