बोईसर: तारापूर औद्योगिक वसाहती मधील एका पोलाद निर्मिती कारखान्यामध्ये जोरदार स्फोट झाल्याची घटना घडली. स्फोटामध्ये एक कामगार जखमी झाला असून त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनास्थळी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी भेट देत पाहणी केली. औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय विभागाकडून स्फोटाच्या कारणांची चौकशी सुरू करण्यात आली आहे.
तारापूर औद्योगिक वसाहती मधील विराज प्रोफाइल एसएमएस या प्लांटमध्ये सोमवारी सकाळी ११.४५ वाजेच्या सुमारास भट्टीमध्ये पोलाद वितळविण्याची प्रक्रिया सुरू असताना जोरदार स्फोट झाला. या स्फोटामध्ये धर्मेंद्र कुमार रामअवध शर्मा (४५) हा क्रेन चालक भाजला असून त्याच्यावर बोईसर येथील स्टार लाईट रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
स्फोटाची तीव्रता इतकी मोठी होती की विराज प्रोफाइल कारखान्यासह आजूबाजूचा परिसर हादरल्याने कामगारांनी घाबरून बाहेर रस्त्यावर पळ काढला. कारखान्याचे पत्रे दूरवर फेकले गेले, शेजारील कारखान्यांच्या खिडकीच्या काचा फुटल्या. स्फोटाच्या दोन मिनिटे अगोदर धोक्याची सूचना देणारा अलार्म वाजल्याने घटनास्थळी उपस्थित सर्व कामगारांनी बाहेर पळ काढल्याने मोठी जीवितहानी टळली.
अपघाताची माहिती मिळतात तारापूर अग्निशमन दल, पोलीस अधीक्षक यतीश देशमुख, उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस निरीक्षक सुनील जाधव यानी कारखान्याला भेट देऊन पाहणी केली. औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयाच्या अधिकाऱ्यांनी स्फोटाच्या कारणाची तपासणी करून चौकशी करण्यात येत आहे.
