scorecardresearch

‘त्या’ १७ गावांना तात्पुरते पाणी:झांझरोली धरणावर आधारित योजनेंतर्गत सक्शन पंपाद्वारे पाणीपुरवठा; दीड लाख ग्रामस्थांना दिलासा

भगदाड पडलेल्या झांझरोली धरणातील दुरुस्तीचे काम हाती घेतल्याने या धरणावर आधारित नळपाणी योजना गेल्या तीन आठवडय़ांपासून बंद होती.

पालघर: भगदाड पडलेल्या झांझरोली धरणातील दुरुस्तीचे काम हाती घेतल्याने या धरणावर आधारित नळपाणी योजना गेल्या तीन आठवडय़ांपासून बंद होती. अखेर ती तात्पुरत्या स्वरूपात सुरू करण्यात आली असून योजनेंतर्गत जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाने हंगामी व्यवस्था म्हणून सक्शन पंपाद्वारे पाणीपुरवठा सुरू केला आहे. त्यामुळे १७ गावांतील दीड लाख ग्रामस्थांना दिलासा मिळाला आहे.
८ जानेवारी रोजी झांझरोली धरणामध्ये भगदाड पडल्याचे उघडकीस आले होते. पाण्याची पातळी कमी करून या धरणाच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. दरम्यान पर्यायी व्यवस्था म्हणून तरंगणाऱ्या प्रणालीद्वारे पाणीपुरवठा सुरू ठेवण्याची व्यवस्था उभारण्यात जिल्हा परिषदेकडून दिरंगाई झाल्याने तसेच अनेक तांत्रिक अडचणी आल्यामुळे या पाणीपुरवठा योजनेवर आधारित गावांमधील ग्रामस्थांचे अतोनात हाल सुरू होते.
या प्रकरणात स्थानिक स्वराज्य संस्थेचे प्रतिनिधी तसेच लोकप्रतिनिधी यांनी पाठपुरावा करून सक्शन पंपाद्वारे हंगामी पाणी व्यवस्था करण्यात आली आहे. सुमारे एक किलोमीटर लांबीच्या अंतरावर एचडीपीई पाइप जोडण्यात आल्यानंतर सक्शन पंपामधून उपसलेले पाणी ओहोळात सोडून नंतर ते विहिरीमध्ये साठवून त्याच्या पंपिंगद्वारे पाणीपुरवठा या १७ गावांना सुरू करण्यात आला आहे. हा पाणीपुरवठा शनिवारपासून सुरू झाला असून अनेक गावांना काही प्रमाणात पाणी उपलब्ध झाल्याने पाण्याची समस्या तात्पुरती सुटली आहे. दरम्यान डोंगरी, दातिवरे व खार्डी या गावाला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी एडवण येथे फुटल्याने या गावांना अजूनही पाणी उपलब्ध झालेले नाही.
याबाबत दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आल्याचे जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाने सांगितले.
एचडीपीई पाइप मिळण्यास अडचण
हंगामी पद्धतीने पाणीपुरवठा करण्यासाठी धरणाच्या तळाला असलेले पाणी सिंचन विहिरीपर्यंत पाण्याचा प्रश्न होता. आवश्यक व्यासाचे पाइप बाजारात सहज उपलब्ध नसल्याने वेगवेगळय़ा योजनेअंतर्गत जिल्ह्यात वेगवेगळय़ा ठेकेदाराकडे असलेले पाइप एकत्रित करून त्यांचे वेल्डिंग करून जोडण्यात आले. एचडीपीई पाइप मिळवून ते जोडण्याचे आव्हानात्मक काम जिल्हा परिषदेने अहोरात्र करून पूर्ण केल्याने ग्रामस्थांना दिलासा मिळाला आहे.

पर्यायी व्यवस्थेवर काम सुरू
तरंगत्या प्राणालीवर आधारित २५ अश्वमेध क्षमतेच्या पंपाद्वारे पाण्याचा उपसा करणारी यंत्रणा उभारण्याची जिल्हा परिषदेकडून प्रस्तावित होते. यासाठी आवश्यक पंप उपलब्ध होण्याची प्रतीक्षा असून त्यानंतर ही प्रणालीदेखील कार्यान्वित करण्यात येईल असे पाणीपुरवठा विभागाचे म्हणणे आहे. या प्रणालीला कार्यान्वित करण्यासाठी उच्चदाब विद्युत जोडणी आवश्यक असून त्यासाठी रोहित्र उपलब्ध न झाल्यास जनरेटरच्या आधारित व्यवस्था उभारण्यात येईल असे सांगण्यात आले.

श्रेय लाटण्यासाठी चढाओढ
झांझरोली धरणात भगदाड पडल्यानंतर दुरुस्तीदरम्यान पर्यायी व्यवस्थेबाबत जिल्हा प्रशासनाने कोणती व्यवस्था केली याची दरम्यानच्या काळात माहिती घेण्यात लोकप्रतिनिधींना विसर पडला होता. दुरुस्तीचे काम सुरू झाल्यानंतर प्रत्यक्षात पर्यायी व्यवस्था उभी राहिली नसल्याचे गावकऱ्यांनी निदर्शनास आणून दिल्यानंतर पर्यायी व्यवस्था कार्यरत करण्यासाठी लोकप्रतिनिधींनी पाठपुरावा सुरू केला. तसेच व्यवस्था कार्यान्वित होईल असे निश्चित दृष्टिपथात आल्यानंतर दौरा, बैठका आयोजित करून या हंगामी व्यवस्थेचे श्रेय घेण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून आले.

मराठीतील सर्व पालघर ( Palghar ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Temporary water pumps scheme zanjaroli dam villagers districtcouncil water supply department amy

ताज्या बातम्या