जिल्ह्याला साथीच्या आजारांचा विळखा ; ताप, सर्दी, खोकल्याचा संसर्ग झालेल्या रुग्णांमध्ये वाढ

पालघर जिल्ह्याचा ग्रामीण व शहरी भाग सध्या तापाने फणफणत आहे.

जिल्ह्याला साथीच्या आजारांचा विळखा ; ताप, सर्दी, खोकल्याचा संसर्ग झालेल्या रुग्णांमध्ये वाढ

पालघर जिल्ह्याचा ग्रामीण व शहरी भाग सध्या तापाने फणफणत आहे. गेल्या दोन महिन्यांत ताप, सर्दी, खोकला अशा साथरोगाच्या रुग्णांमध्ये लक्षणीय वाढ दिसून येत आहे. उप जिल्हा, ग्रामीण रुग्णालये यांच्यासह प्राथमिक आरोग्य केंद्र व खासगी दवाखान्यात बाह्यरुग्ण तपासणीच्या प्रमाणात कमालीची वाढ झाली आहे.

अचानक झालेल्या हवामान बदल यासह तापमान बदल यामुळे साथरोग झपाटय़ाने वाढू लागल्याचे काही तज्ज्ञांचे म्हणणे आहे. जून महिन्यात सुमारे पन्नास हजार बाह्यरुग्ण तपासणीमध्ये पन्नास टक्क्यांहून अधिक रुग्ण हे साथरोगाचे आहेत. जूनच्या तुलनेत जिल्ह्यातील जिल्हा शल्यचिकित्सक व जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या अखत्यारीत असलेल्या विविध शासकीय आरोग्य संस्थांमध्ये बाह्यरुग्ण तपासणीमध्ये कमालीची वाढ झाली. सुमारे ७० हजाराहून अधिक रुग्णांनी तपासणी केली असता त्यात बहुतांश रुग्ण हे सर्दी, खोकला, ताप, पडसे आदी साथरोगाचे आहेत. साथरोगासाठी जिल्ह्यात आवश्यक व पुरेल इतका औषधसाठा उपलब्ध असल्याचे आरोग्य यंत्रणेने म्हटले आहे.

हवामान बदलाचा हा परिणाम असल्याने यादरम्यान संसर्गातून साथरोग होतो.मात्र त्यामुळे भीतीचे कोणतेही कारण नसल्याचेही आरोग्य यंत्रणेने म्हटले आहे. जिल्ह्यातील पाणी साठवणूक होणाऱ्या ग्रामीण व सागरी किनारपट्टी भागांमध्ये तसेच शहराच्या काही ठराविक भागांमध्ये डास जन्य आजारांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे ही वाढ पूर्वीपेक्षा कमी असली तरी डेंग्यू ,मलेरिया, स्वाइन फ्लू, चिकनगुनिया अशा तापजन्य गंभीर आजारांबरोबर लेप्टोस्पायरोसिस सारखे रुग्णही पावसाळय़ा दरम्यान आढळून येत आहेत. मलेरिया या रोगाचे आजाराचे रुग्णसंख्या कमी असली तरी डासांच्या फैलावामुळे तो वाढण्याची भीती वर्तवली जात आहे. अलीकडेच तलासरी तालुक्यात आश्रम शाळांमधील विद्यार्थ्यांसह ते वावर करत असलेल्या इतर परिसरातही स्वाइन फ्लूचे जवळपास ३० रुग्ण आढळून आले होते. विद्यार्थ्यांना तो झाल्याने भीती वर्तवली गेली होती. मात्र योग्य उपचारामुळे ते वेळीच बरे झाले.

सध्या जिल्ह्याला करोनाची भीती नसली तरी साथजन्य आजारांबरोबर इतर गंभीर तापजन्य आजार पुढे आणखीन वाढण्याची शक्यता आहे. त्या दृष्टिकोनातून आरोग्य विभाग सर्व हालचालींवर लक्ष ठेवून आहे. तसेच वारंवार तपासण्या करणे, कोरडा दिवस पाळणे, औषधोपचार नियमित देणे, जोखमीच्या व्यक्तींना देखरेखी खाली ठेवणे यासह इतर उपाययोजना आरोग्य विभागामार्फत सुरू आहेत. नागरिकांनीही स्वत:ची नैतिक जबाबदारी म्हणून काळजी घेणे आवश्यक असल्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.

उपजिल्हा व ग्रामीण रुग्णालयात गेल्या तीन महिन्यात बाह्य रुग्ण तपासणी करणाऱ्या रुग्णांचा आकडा वाढत चालला आहे. एप्रिल दरम्यान जिल्ह्यातील बारा आरोग्य संस्थांमधून ४१,७४६ रुग्णांनी तपासणी केली. मे मध्ये हा आकडा सुमारे पाच हजार रुग्णांनी वाढला. मे महिन्यात ४६,११८ रुग्णांनी बाह्यरुग्ण सामान्य तपासणी केल्या आहेत. तर जून मध्ये या आकडय़ांमध्ये जवळपास नऊ हजार रुग्णांची भर पडली. जूनमध्ये ५७ हजार ७० रुग्णांनी बाह्य रुग्ण विभागात आपली सामान्य तपासणी केली आहे.

दररोज १५० रुग्णांची तपासणी
लोकसंख्येवर आधारित जिल्हा ४५ प्राथमिक आरोग्य केंद्र ग्रामीण भागांमध्ये कार्यरत आहेत या प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये दररोज किमान ५० व कमाल १५० रुग्ण बाह्य रुग्ण तपासणी विभागात आपल्या तपासण्या करून घेत आहेत सद्यास्थितीत रुग्णांची आकडेवारी १५ ते २० टक्क्यांनी वाढल्याची शक्यता आहे.

नियमावलीचे पालन नाही
भारत सरकारच्या आरोग्य नियमावलीनुसार एखाद्या परिसरातील लोकसंख्येपैकी साथजन्य आजार आढळलेल्या भागांमध्ये लोकसंख्येच्या किमान १५ टक्के रक्त तपासण्या सरासरी पद्धतीने करून तापाचे स्वरूप निदान केले जाणे आवश्यक आहे किंवा रुग्ण आढळून येत असलेल्या लोकसंख्येच्या एक टक्के दरमहा रक्त तपासण्या करणे आवश्यक आहे. यामुळे निदान झालेल्या आजारावर आरोग्य यंत्रणेमार्फत उपाययोजना करणे शक्य होते. मात्र काही शासकीय आरोग्य संस्थांच्या ठिकाणी ही नियमावली पाळली जाते तर काही ठिकाणी ती पाळली जात नाही.

सध्या साथरोग रुग्ण वाढत असले तरी सामान्य उपचारामुळे ते बरे होत आहेत. त्यात भीतीचे कारण नाही. डासजन्य आजारांसाठी आरोग्य विभाग योग्य त्या उपाययोजना करत आहे.नागरिकांची तसेच स्थानिक स्वराज्य संस्था यांचीही तितकीच जबाबदारी आहे. त्यांनीही खबरदारी घेणे आवश्यक आहे. – डॉ.सागर पाटील, जिल्हा हिवताप अधिकारी,पालघर

मराठीतील सर्व पालघर ( Palghar ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
पालघर जिल्ह्यामध्ये ४ लाख ८० हजार घरांवर तिरंगा फडकणार
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी