scorecardresearch

राष्ट्रीय महामार्ग मृत्यूचा सापळा ; १८ महिन्यांत ९६ अपघात, १०६ जणांचा मृत्यू

मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर दिवसेंदिवस अपघातांमध्ये वाढ होत आहे.

राष्ट्रीय महामार्ग मृत्यूचा सापळा ; १८ महिन्यांत ९६ अपघात, १०६ जणांचा मृत्यू

विजय राऊत
कासा: मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर दिवसेंदिवस अपघातांमध्ये वाढ होत आहे. मनोर ते अच्छाड या ५२ किलोमीटरच्या रस्त्यावर गेल्या १८ महिन्यांत ९६ पेक्षा अधिक अपघात झाले आहे. यामध्ये १०६ नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. त्याचबरोबर ४९ नागरिकांना कायमचे अपंगत्व आले आहे.

मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर मेंढवण घाटाच्या उतारावर व एका टेकडीवर तीव्र वळण आहे. या वळणावर नवीन वाहनचालकांना वळणाचा अंदाज येत नसल्यामुळे वाहनावरील नियंत्रण सुटते आणि वाहन सुरक्षा कठडय़ावर जाऊन आदळते किंवा रस्ता दुभाजक ओलांडून विरुद्ध दिशेच्या मार्गिकेवर जाऊन उलटते.

चारोटी येथील उड्डाणपुलावरदेखील तीव्र वळण असल्यामुळे गुजरातकडून मुंबईकडे येणारी वाहने पुलाच्या कठडय़ाला आदळून पुलावरून खाली पडण्याचेसुद्धा प्रकार घडले आहेत. या उड्डाणपुलावर अनेक दुचाकीस्वारांचे अपघातांमध्ये जीव गेले आहेत. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने वाहनचालकांच्या सतर्कतेसाठी दोन्ही पुलावर प्रकाश योजना करण्याचे योजिले असले तरीही या दोन्ही पुलांवरील वळण कमी करून हा भाग सरळ करावा, अशी मागणी लोकप्रतिनिधींनी अनेकदा केली आहे.

आंबोली गावाजवळ आराम हॉटेलसमोर रस्त्याच्या दुभाजकाला छेद देऊन रस्ता ओलांडण्यासाठी जागा अवैधरीत्या निर्माण करण्यात आलेली आहे. या ठिकाणी तीव्र उतार असल्याने रस्ता ओलांडताना अनेक जणांना आपले प्राण गमावावे लागले आहेत.
या ठिकाणी रस्ता ओलांडण्यासाठी पुलाची मागणी अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. तसेच ज्या ठिकाणी रस्ता ओलांडण्याची सुविधा आहे त्या ठिकाणी सिग्नल यंत्रणा कार्यान्वित ठेवणे गरजेचे आहे.

कोटय़वधी रुपयांचा टोल वसूल केला जात असताना वाहनचालकांच्या व प्रवाशांच्या सुरक्षिततेकडे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि जिल्हा प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जात आहे. तीव्र वळणाच्या पूर्वी मोठय़ा आकाराचे सूचना फलक लावणे गरजेचे आहे. दरम्यान, कल्याणी कंपनीला पोलिसांकडून पत्रव्यवहार करण्यात आला आहे. अपघात झाल्यानंतर पुरेशी सामग्री उपलब्ध नसल्यामुळे अनेकांना या मार्गावर प्राण गमवावे लागतात. याबाबत पाठपुरावा सुरू असल्याचे महामार्ग पोलीस अधिकारी अमरसिंग सूर्यवंशी यांनी सांगितले आहे.

अपघातांचा तपशील देण्यास टाळाटाळ
मनोर आच्छाड पट्टयातील महामार्गावर होणाऱ्या अपघातांची नोंद मनोर, कासा व तलासरी पोलीस ठाण्यात होत असते. मात्र अपघात भागाचे ब्लॅक स्पॉटमध्ये रूपांतर होऊ नये म्हणून तक्रार नोंदविताना देखभाल करणाऱ्या कंपनीच्या प्रतिनिधींकडून ठिकाण पुढे मागे दाखवून बदलण्यात येते. हे प्रकार उघडकीस येऊ नये म्हणून अपघातांचा तपशील दडविला जात असल्याचे आरोप केले जात आहेत.

सुविधांची कमतरता
महामार्गाची देखभाल दुरुस्तीचे व टोल वसुलीचे काम करणाऱ्या कल्याणी कंपनीकडे असून अपघात झाल्यानंतर आग लागल्यास ती विझवण्यासाठी स्वत:ची अग्निशमन यंत्रणा नाही. त्याचप्रमाणे अपघातग्रस्त वाहने बाजूला करण्यासाठी पुरेशा क्षमतेची क्रेन व्यवस्था नाही. जखमींना तातडीने उपचारासाठी दवाखान्यात दाखल करता यावे यासाठी आवश्यक प्रमाणात रुग्णवाहिका नाहीत. यामुळे अपघात झाल्यानंतर वेळेत उपचार न मिळाल्याने अनेक जणांचे मृत्यू झाले असल्याचे दिसून आले आहे.

मराठीतील सर्व पालघर ( Palghar ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: The national highway is a death trap amy

ताज्या बातम्या