scorecardresearch

राष्ट्रीय प्रकल्पाची सुरक्षा वाऱ्यावर ; तारापूर अणुउर्जा प्रकल्पाच्या संरक्षण यंत्रणेतील त्रुटींकडे लक्ष देण्याची गरज

रात्रपाळीवर कामाला असलेल्या मनोज यादव यांनी गुरुवारी दुपारी आपण बदली डय़ुटीद्वारे कामावर रुजू होत असल्याचे सांगत कार्यालयातून शस्त्रे घेतली.

राष्ट्रीय प्रकल्पाची सुरक्षा वाऱ्यावर ; तारापूर अणुउर्जा प्रकल्पाच्या संरक्षण यंत्रणेतील त्रुटींकडे लक्ष देण्याची गरज

पालघर : देशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या तारापूर अणुऊर्जा केंद्र तसेच भाभा अणु संशोधन केंद्राच्या सुरक्षिततेची जबाबदारी सांभाळणाऱ्या केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचा (सीआयएसएफ) एक जवान पिस्तूलासह ३० जिवंत काडतुसे घेऊन काल दुपारपासून फरार झाला आहे. सीआयएसएफ तसेच राज्य पोलिसांमार्फत या प्रकरणाचा तपास सुरू आहे, परंतु या निमित्ताने तारापूरसारख्या राष्ट्रीय प्रकल्पांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

रात्रपाळीवर कामाला असलेल्या मनोज यादव यांनी गुरुवारी दुपारी आपण बदली डय़ुटीद्वारे कामावर रुजू होत असल्याचे सांगत कार्यालयातून शस्त्रे घेतली. दुपारी साडेबारा ते एकच्या सुमारास सीआयएसएफ कर्मचारी वसाहत संकुलातून तो बेपत्ता झाला. दीडच्या सुमारास त्याचे लोकेशन बोईसर रेल्वे स्थानकाजवळ दिसल्याचे समजते. काम संपल्यानंतर हा कर्मचारी शस्त्रे जमा करण्यास न आल्याने त्याची शोधाशोध सुरू झाली. बहुतांश पोलीस कर्मचारी दीड दिवसाच्या गणपतीच्या बंदोबस्तावर असल्याने याप्रकरणी तक्रार नोंदवण्यास मध्यरात्र उजाडली.

पोलिसांनी काल रात्री परिसरातील सर्व संशयित ठिकाणांचा तपास केला. तसेच मोबाइल ट्रॅकिंगद्वारे त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला आहे. अणुऊर्जा केंद्रातील तसेच सुरक्षा नाक्यांच्या ठिकाणी असलेल्या सीसीटीव्ही फुटेजचीही कसून तपासणी करण्यात येत आहे. या जवानाचा मोबाइल बंद आहे. घरगुती किंवा जमिनीच्या वादाच्या पार्श्वभूमीवर जवान यादव हा अग्निशस्त्र घेऊन पसार झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच त्याची मानसिक स्थिती बिघडल्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे.

तारापूर अणुऊर्जा केंद्राची जबाबदारी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाकडे आहे. मात्र या ठिकाणी यापूर्वीसुद्धा अनेक सुरक्षाविषयक त्रुटी आढळल्या होत्या. येथे उभारण्यात येणाऱ्या इंटिग्रेटेड न्यूक्लिअर रिसायकल प्लँटमधून अनेकदा महागडय़ा वस्तूंची चोरी झाली होती. तसेच केंद्रात यापूर्वीदेखील एका सुरक्षारक्षकाने बेदरकारपणे वाहन चालवल्याने अपघात घडला होता.

याविषयी पालघरचे अपर पोलीस अधीक्षक प्रकाश गायकवाड यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी अग्निशास्त्र व जिवंत काडतुसे घेऊन बेपत्ता झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. तसेच त्याचा तपास सुरू असल्याचे सांगितले. तारापूर सीआयएसएफचे कमांडर अभिषेक यादव यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही. आपण अत्यंत महत्त्वाच्या कामात व्यग्र असल्याचे त्यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले.


सीआयएसएफ’कडून हलगर्जी?तारापूर येथील

अणुऊर्जा तसेच अणुसंशोधन संदर्भातील आस्थापनांवर देखरेख ठेवण्यासाठी ४८७ सुरक्षा कर्मचारी तैनात आहेत. मात्र त्यांच्यावर देखरेख ठेवण्यासाठी असणाऱ्या व्यवस्थेत त्रुटी निदर्शनास आल्या आहेत. अग्निशस्त्रासह फरार झालेल्या जवानाची माहिती, स्थानिक पोलीस ठाण्याला तब्बल नऊ तासांनंतर दिली गेली. त्यामुळेच सदर जवान राज्याबाहेर पळाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

मराठीतील सर्व पालघर ( Palghar ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

ताज्या बातम्या