पालघर : सवलती आणि अनुदानाच्या बाबतीत द्राक्षापासून बनणाऱ्या वाइनला दिले जाणारे झुकते माप, सर्व वाइन उद्योगासाठी नसलेले समान धोरण आणि चिकूसह आंबा, करमळ (कमरेत), स्ट्रॉबेरी, अननस, जांभूळ आदी फळे तसेच मधापासून बनणाऱ्या वाइन उत्पादकांना बाजारातील स्पर्धेचा करावा लागणारा सामना, यामुळे वाइन उद्योगाचा अस्तित्वासाठी संघर्ष सुरू आहे. आंतरराष्ट्रीय घडामोडींमुळे ‘वाइन’ उद्योगाला भरारी घेण्याची संधी आहे. परंतु राज्यात धोरणात्मक बदल झाले तरच हा उद्योग टिकाव धरेल, निर्यातक्षम ठरू शकेल, असा सूर आता वाइन उत्पादकांकडून व्यक्त होऊ लागला आहे.
राज्य सरकारने २०१७ मध्ये उत्पादन शुल्क धोरणात ऐतिहासिक बदल करत वाइनची व्याख्या केवळ द्राक्षांपुरती मर्यादित न ठेवता, फळे, मध, फुले आणि इतर कृषी उत्पादनांपासून तयार होणाऱ्या किण्वित पेयांना (फर्मेंटेड बेव्हरेजस) ‘वाइन’ या श्रेणीत औपचारिक मान्यता दिली. ‘मीड’ (मधापासून बनवलेली वाइन) ही संज्ञा कायदेशीररीत्या परिभाषित झाली. यामुळे कृषी-आधारित एका नव्या उद्योग क्षेत्राचा जन्म झाला. २०१९ मध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाने धोरणात पुन्हा महत्त्वपूर्ण बदल करत फळ व मध वाइनवरील उत्पादन शुल्क, जे पूर्वी १०० टक्के उत्पादन खर्चाएवढे होते, ते केवळ एक रुपया प्रतिलिटर इतके केले.
परंतु करोनाकाळादरम्यान आर्थिक अडचणींमुळे २००९ पासून सुरू असलेल्या ‘वाइन उद्योग प्रोत्साहन योजने’अंतर्गत (डब्ल्यूआयपीएस) द्राक्ष वाइन उद्योगासाठी देण्यात येणारे प्रोत्साहन थांबवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. परिणामी, लहान उत्पादकांनी बाजारात प्रवेश केला व या नावीन्यपूर्ण उद्योगांना बाजारपेठेत सकारात्मक प्रतिसाद मिळाला. २०२१ मध्ये राज्य सरकारने एकसमान वाइन धोरण राबवविताना उत्पादन शुल्कातील सवलती संपवून वाइन श्रेणीला १० रुपये प्रतिलिटर शुल्क लागू केले.तीन वर्षांच्या कालावधीतच २०२३ मध्ये राज्य शासनाने द्राक्ष वाइन उद्योगासाठी ‘डब्ल्यूआयपीएस’ ही योजना पुढील पाच वर्षांच्या कालावधीसाठी लागू केली. परंतु यात इतर फळे व मध वाइनचा समावेश केला नाही. त्यामुळे सध्याची आंतरराष्ट्रीय स्थिती लक्षात घेऊन विविध फळांवर आधारित वाइन उद्योगांना पुनरुज्जीवित करण्याची मागणी उत्पादकांकडून होऊ लागली आहे.
‘वेगळेपणावर भर देणे गरजेचे’
पालघर जिल्ह्यातील बोर्डी परिसरातील चिकू वाइनसाठी प्रसिद्ध झालेल्या ‘हिल झिल वाइन्स’ने युरोपीय गुंतवणूक आकर्षित केली होती. मात्र राज्य सरकारचे द्राक्षापासून बनणाऱ्या वाइनला अनुदानाचे झुकते माप दिल्याने २०१७मध्ये सुरू झालेला हा उद्योग २०२४ मध्ये नाइलाजाने बंद करावा लागला. नव्या व्यापार करारांमुळे भारताने वेगळेपणावर भर दिला पाहिजे. वाइन उद्योगाचे भविष्य धोरणांवर अवलंबून आहे, असे मत प्रियंका सावे यांनी ‘हिल झिल वाइन्स’च्या संचालिका तसेच वाइन धोरणतज्ज्ञ प्रियंका सावे ‘लोकसत्ता’कडे व्यक्त केले आहे.
‘बाजारात स्पर्धा करणे अशक्य’
आशियाई खंडातील पहिली मधापासून वाइन उत्पादित करणाऱ्या ‘रोनीन वाइन्स’ या मुळशी (पुणे) येथील मीडरी कंपनीच्या ‘मूनशाइन’ नामक मीड ब्रँडने एकाच वर्षात सुमारे ८० हजार केसेसची विक्री गाठली व १२ कोटी रुपयांची गुंतवणूक उभी केली. मात्र २०२४ पासून शासनाच्या नवीन धोरणानंतर कंपनीला तोटा झाला. द्राक्षापासून उत्पादित वाइनला भरघोस सवलत दिली जात आहे. परिणामी मध व इतर फळांपासून उत्पादित वाइनला बाजारात स्पर्धा करणे अशक्य झाल्याने विक्रीमध्ये मोठ्या प्रमाणात घट झाली, असे कंपनीचे संचालक नितीन विश्वास यांनी सांगितले.
स्थानिक फळांचा वापर करून उत्पादित होणाऱ्या वाइनला कर सवलत देऊन प्रोत्साहन देणे आवश्यक आहे. परंतु बहुतांश परदेशी वाणांच्या द्राक्षापासून तयार केलेल्या वाइनला प्रोत्साहित करण्याकडे राज्य सरकारचा कल राहिला आहे. – नीरज अग्रवाल, मुख्य कार्यकारी अधिकारी, ‘रिसवेरा वाइन’
आंबा, चिकू, डाळिंब यांसारख्या फळांपासून वाइनचे उत्पादन करून आम्ही तीन कोटी रुपयांपर्यंत उलाढाल केली होती. मात्र शासनाकडून द्राक्षाव्यतिरिक्त इतर फळांपासून उत्पादित वाइनला कर सवलत दिली न गेल्याने उत्पादन बंद केले. – प्रदीप पाचपाटील, संचालक, सोमा वाइन, नाशिक
वाइन उद्योगासाठी महाराष्ट्र का महत्त्वाचा?
– भारतात वार्षिक वाइन विक्री सुमारे ४१-४२ दशलक्ष लिटर इतकी असून प्रीमियम श्रेणीतील वाइनला वाढती मागणी आहे. महाराष्ट्र हा भारतीय वाइन उद्योगाचा मुख्य आधार आहे.
– महाराष्ट्रात २०२४- २५ मध्ये वाइन विक्री १.२१ कोटी लिटर इतकी होती. महाराष्ट्र देशातील सुमारे ९० टक्के द्राक्ष वाइन उत्पादन करतो. देशातील वाइनसाठीच्या पायाभूत सुविधा, तंत्रज्ञान व कौशल्य महाराष्ट्र केंद्रित आहे.
