पालघर: पालघर लोकसभा क्षेत्रातील सहा मतदान केंद्रांमध्ये १५०० पेक्षा अधिक मतदार संख्या झाल्याने २० नवीन मतदार केंद्र निर्माण करण्यात आली असती तरीही २२ केंद्रांमध्ये मतदार संख्या कमी झाल्याने त्यांचे विलीनीकरण करण्यात आले आहे .यामुळे पूर्वीच्या निवडणुकीच्या तुलनेत जिल्ह्यातील मतदान केंद्रांची संख्या २२४२ वरून २२४० वर आली आहे याखेरीस १०९ मतदार केंद्राच्या स्थानात बदल करण्यात आला असून जिल्हा निवडणूक शाखेने मतदार केंद्रांची यादी प्रसिद्ध केली आहे.
छायाचित्र मतदार यादीचे विशेष पुनर्निरीक्षण कार्यक्रम हाती घेण्यात आला असून त्या अंतर्गत मतदान केंद्रांच्या सुसूत्रीकरणाचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. १५०० पेक्षा अधिक मतदार संख्या असणाऱ्या किंवा मतदार वाढीचा वेग लक्षात घेता आगामी काळात ही संख्या ओलांडण्याच्या शक्यता असणाऱ्या २० मतदार केंद्र वाढवण्यात आले आहेत. यामध्ये बोईसर व नालासोपारा विधानसभा क्षेत्रात प्रत्येकी सात तर डहाणू व विक्रमगड विधानसभा मतदारसंघात प्रत्येकी तीन मतदान केंद्रांची वाढ करण्यात आली आहे.निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार दोन किलोमीटर परिघात कमी मतदार संख्या असणाऱ्या मतदान केंद्रांचे विलीनीकरण करण्याचे अधिकार जिल्हा निवडणूक विभागाला देण्यात आले असून त्यानुसार बोईसर विधानसभा क्षेत्रातील १२ तर नालासोपारा विधानसभा क्षेत्रातील १० असे एकूण २२ मतदान केंद्रांचे विलीनीकरण करण्यात आले आहे.
हेही वाचा >>>वडिलांच्या पार्थिवाला मुलींनीच दिला खांदा
याच बरोबरीने १०९ मतदार केंद्राच्या स्थानात बदल करण्यात आला असून १५९ मतदार केंद्रांच्या नावामध्ये बदल करण्यात आला आहे. या सर्व बदलांची सुधारित यादी जिल्हा निवडणूक विभागाने प्रसिद्ध केली असून ही यादी सर्व राजकीय पक्षांना पुरवण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांनी दिली आहे.
हेही वाचा >>>पालघर जिल्ह्य़ात ओबीसींचे शक्तिप्रदर्शन
पदवीधर मतदार नोंदणी कार्यक्रम जाहीर
पुढील वर्षी होऊ पाहणाऱ्या पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून मतदार याद्या करण्यासाठी ०५ सप्टेंबर रोजी सूचना प्रसिद्ध करण्यात आल्या असून ३१ ऑक्टोबर २०२० पूर्वी पदवी प्राप्त केलेल्या नागरिकांनी या निवडणुकीसाठी नव्याने मतदार नोंदणी करण्याचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. मतदार नोंदणी संदर्भातील सूचना ३० सप्टेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात येणार असून या अधिसूचनेचे नियमाप्रमाणे पुनर्प्रसिद्धी करण्यात येणार आहे. या मतदार नोंदणी कार्यक्रमात ०६ नोव्हेंबर पर्यंत हरकती स्वीकारण्यात येणार असून २३ नोव्हेंबर रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्यासंदर्भात दावे व हरकतींची सुनावणी पूर्ण करून पुरवणी यादी २५ डिसेंबर रोजी तर अंतिम मतदार यादी ३० डिसेंबर रोजी प्रसिद्ध होईल असे जिल्हा निवडणूक विभागाने कळवले आहे.
जिल्ह्यात प्राप्त झालेल्या ईव्हीएम मशीनची प्राथमिक तपासणी पूर्ण झाली असून त्याचा तपशील राजकीय पक्षांना पुरवण्यात येत असल्याची माहिती निवडणूक विभागातर्फे देण्यात आली.