पालघर: वैतरणा नदीवर बांधण्यात येणाऱ्या नवीन पुलासाठी आणि द्रुतगती अवजड वाहतुकीमुळे सफाळे ते नवघर घाटीम दरम्यानचा रस्ता अतिशय खराब झाला आहे. या रस्त्याची वेळीच दुरुस्ती न केल्यास स्थानिकांनी त्याविरुद्ध आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.वैतरणा नदीपात्रावर नव्याने बांधण्यात येणाऱ्या मुंबई- वडोदरा द्रुतगती मार्गिकेवर पश्चिम रेल्वेवरील पूल क्रमांक ९३चे बांधकाम सुरू आहे. या बांधकामासाठी माती, दगड, खडी लोखंड आदी सामुग्रीची गेले वर्षभर वाहतूक सुरू आहे. या वाहतुकीसाठी अवजड वाहने वापरली जातात. त्यामध्ये क्षमतेपेक्षा कितीतरी जास्त माल भरला जात असल्याचा आरोपही केला जात आहे.

या वाहनांच्या सततच्या वाहतुकीमुळे तसेच रस्त्यावर पडणाऱ्या या अतिरिक्त दाबामुळे रस्त्यात खड्डे पडले आहेत. अशा वेळी रस्त्याला डागडुजी-दुरुस्तीची गरज असते. मात्र ती केलीच जात नसल्याने रस्त्याची अवस्था अधिकाधिक बिकट होत आहे.याबाबत स्थानिकांनी विविध पातळीवर दाद मागितली आहे. मात्र जिल्हा प्रशासन, संबंधित ठेकेदार कंपनी याबद्दल बोलायलाच तयार नाही.गणेशोत्सवापूर्वी हा रस्ता खड्डेमुक्त करण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे. तसे न केल्यास मार्ग उभारणी करणाऱ्या कंपनी व ठेकेदाराविरुद्ध मोर्चा काढणे व रास्ता रोको आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी व राजकीय पक्षांनी दिला आहे.