पालघर : महागडय़ा सायकल चोरून त्या कामगारांना विक्री करणाऱ्या दोन सराईत चोरांना सफाळे पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून सुमारे सव्वा लाख रुपयांच्या तेरा महागडय़ा सायकली हस्तगत केल्या आहेत. चोरटय़ांमध्ये एक अल्पवयीन आहे. सफाळे बाजारपेठ परिसरात गेल्या काही दिवसांपासून सायकल चोरीचे प्रमाण वाढले होते. याबाबत पोलिसांकडे तक्रार आल्यानंतर याची दखल घेत पोलिसांनी सायकल चोरीचा तपास सुरू केला होता, अशी माहिती पोलीस मित्र येशू डिमेलो यांनी पोलीस अधिकारी संदीप कहाळे यांना दिली. संदीप कहाळे यांनी चोरांना शोधण्यासाठी विशेष पथक स्थापन करून गस्त मोहीम राबवली. अखेर या मोहिमेदरम्यान गुरुवारी रात्री दोन ते तीन संशयितांना ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी अनेक सायकल चोरल्याची कबुली दिली व चोरी केलेल्या सायकली बोईसर परिसरात विक्री करत असल्याचा कबुलीजबाब पोलिसांकडे दिला.

त्यांच्याविरुद्ध सफाळे पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. उपनिरीक्षक रिजवाना ककेरी, प्राजक्ता पाटील, पोलीस कर्मचारी आत्माराम बोरसे, कल्पेश केणी,शिवाजी चिमकर, वैभव सातपुते, नारायण धोंगडे, अनंता खोत, भरत भावर यांनी ही कारवाई केली आहे.महिलेमार्फत चोरीच्या सायकलींची विक्री सफाळे परिसरात विविध ठिकाणी पार्क केलेल्या महागडय़ा सायकली चोरण्याचे काम हे चोर करत होते. त्या रेल्वेतून बोईसर येथे घेऊन जात. तेथील एका महिलेमार्फत या सायकली कामगार वर्गाला विक्री केल्या जात होत्या. बोईसरसह पालघर भागात देखील या तरुण चोरांनी पैश्यांच्या लोभापोटी सायकल चोरून त्या विक्री केल्याची कबुली पोलिसांकडे दिली आहे. ज्यांच्या सायकली हरवल्या असतील अशानी सफाळे पोलीस ठाण्यात संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस अधिकारी संदीप कहाळे यांनी केले आहे.