कासा : मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग तवा गावाच्या परिसरामध्ये  गेल्या सहा महिन्यात  तब्बल १३ गंभीर अपघात होऊन अनेक जण जखमी झाले आहेत.  शनिवारी तवागावाच्या जवळील पुलावरून कंटेनर उलटून गंभीर अपघात झाला होता तवा गावाच्या जवळ असणाऱ्या पुलावर मोठ मोठे खड्डे आहेत तसेच या ठिकाणी तीव्र वळण आहे त्यामुळे वाहन चालकांना रस्त्याचा अंदाज येत नाही आणि गंभीर अपघात होतात.

दीड महिन्यापूर्वी याच ठिकाणी खाद्य तेलाचा टँकर उलटून अपघात झाला होता परिसरातील लोकांनी मोठय़ा प्रमाणात टँकर मधून खाद्य्तेल नेले होते त्यामुळे खाद्य्तेल चालकाचे मोठय़ा प्रमाणात आर्थिक नुकसान झाले होते. १९९३ मध्ये मेंढवन खिंडीत असाच अतिशय ज्वालाग्रही रसायन घेऊन जाणारा टँकर उलटून अपघात झाला होता टँकर उलटल्यानंतर नागरिकांना टँकर मध्ये पेट्रोल समजून ज्वलनशील पदार्थ नेत असताना आग लागून ११० नागरिकांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता

तवा या ठिकाणी सुद्धा गंभीर अपघात होत असल्याने तसेच दररोज मोठय़ा प्रमाणात ज्वलनशील पदार्थांचे वाहतूक महामार्गावरून होत असते या ठिकाणी असा अपघात घडल्यास १९९३ च्या अपघाताची पुनरावृत्ती होण्याची सुद्धा शक्यता आहे. गेल्या सहा महिन्यांमध्ये लहान मोठय़ा अपघातामध्ये अनेक वाहनचालक गंभीररित्या जखमी झाले आहेत. तरी या अपघात ठिकाणी असलेले खड्डे बुजवून तसेच या अपघात स्थळाच्या आसपास सूचनाफलक लावून अपघातांवर नियंत्रण आणण्याची मागणी वाहनचालकांकडून केली जात आहे.