पालघरमध्ये विचित्र आजाराने तिघांचा मृत्यू ; तालुक्यातील अनेक पाडय़ांत आजार, ग्रामस्थांमध्ये घबराट

मृतकांचे शवविच्छेदन न केल्यामुळे मृत्यूचे नेमके कारण अजूनही समजू शकलेले नाही.

पालघर : पालघर तालुक्यातील माहीम ग्रामपंचायत हद्दीतील काही पाडय़ांमध्ये चार ते पाच जणांचा विचित्र आजाराने तीन जणांचा अचानक मृत्यू झाल्याने पाडय़ातील नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. ही प्रशासकीय आकडेवारी असली तरी यापेक्षा अधिक जणांचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तविण्यात येते. या मृतांचे शवविच्छेदन न झाल्यामुळे मृत्यूचे नेमके कारण समजले नाही. मात्र या घटनेमुळे आरोग्य विभागासह प्रशासन सतर्क झाले आहे. .

काही दिवसांपूर्वी माहीम ग्रामपंचायत हद्दीतील रेल्वे लाईन परिसरातील पाडय़ांमध्ये  काहींना सर्दी, खोकला,रक्ताच्या उलटय़ा,ताप अशी लक्षणे अचानकपणे सुरू झाली होती. सौम्य आजार असताना या रुग्णांनी एका खासगी डॉक्टरकडून उपचार करून घेतले होते.  त्यावेळी त्यांना योग्य ती औषधे व उपचार त्यांच्या लक्षणाप्रमाणे देण्यात आली होती.  परंतु त्या उपचारांना प्रतिसाद मिळाला नाही.    या खासगी डॉक्टरांचा तपासणी अहवाल  आरोग्य विभागाला देण्यात आला आहे.    मृत्यूच्या घटनेनंतर आरोग्य विभागाने नेमके कारण शोधण्यास सुरुवात केली.  या भागात डेंग्यू, मलेरिया, टाइफाइड यासह इतर संशयीत आजाराबाबत  सर्वेक्षणे, तपासणी करण्यात आली.  परंतु त्यातून काही निष्पन्न झाले नाही. सर्वेक्षणामध्ये डासांचा खूप प्रादुर्भाव नसल्याचेही येथे आढळून आले. 

मृतकांचे शवविच्छेदन न केल्यामुळे मृत्यूचे नेमके कारण अजूनही समजू शकलेले नाही. असे असले तरी आरोग्य विभाग सतर्क झाला असून या भागात लक्ष ठेवून आहे, असे एका आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. ग्रामपंचायत प्रशासनालाही याबाबत कळवले असून खबरदारी घेण्याची सूचना करण्यात आल्याचे सांगण्यात येते.

दरम्यान, मृत्यू पावलेल्यापैकी काहींनी स्वत:ला कावीळ असल्याचे स्वघोषित करून किंवा लक्षण असल्याचे समजून त्यांनी त्यावर औषधोपचार न करता गावठी उपाय सुरू केले असल्याचेही वृत्त आहे. त्यामुळे ग्रामीण भागांमध्ये असे प्रकार चालत असतील तर जनजागृती करून हे प्रकार वेळीच थांबवणे आवश्यक असल्याचेही सांगितले जात आहे.

दूषित पाण्यामुळे मृत्यू?

तालुक्यातील पाडय़ांतील पिण्याचे तसेच वापराच्या पाण्याचे नमुने घेण्यात आले आहेत. ते पाणी पिण्यास अयोग्य असल्याचे भूजल सर्वेक्षण अधिकारी यांचा अहवाल आहे. त्यामुळे या दूषित पाण्यामुळे आजार होऊन  त्यात या तिघांचा मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या पाडय़ांच्या परिसरात अनेक कंपन्या चोरटय़ा मार्गाने प्रदूषित सांडपाणी जमिनीत सोडत असल्याने हे प्रदूषित पाणी तेथील कूपनलिका आणि विहिरींमध्ये येते. ते पाणी पिण्यामुळे  ग्रामस्थांच्या आरोग्याला धोका असल्याचे काहींचे म्हणणे आहे.  या पाण्यामुळेच आजार होऊन हे तरुण दगावली असतील अशी उलट सुलट चर्चा होत आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व पालघर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Three die of strange disease in palghar zws

Next Story
खते, बियाणे महाग दरात विकल्यास कारवाई
ताज्या बातम्या