कासा  :  मोखाडा तालुक्यातील पायरवाडीतील एका सहा वर्षीय मुलाचा जव्हारमधील कुटीर रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. रुग्णवाहिकेचे भाडे देण्यासाठी पैसे नसल्यामुळे मृतदेह दुचाकीवरून नेण्याची वेळ त्याच्या पालकांवर आली. त्यामुळे परिसरात सरकारी यंत्रणेविषयी संताप व्यक्त केला जात आहे. मोखाडा तालुक्यातील पायरवाडी या गावामधील अजय युवराज पारधी या मुलाला दोन दिवसांपूर्वी ताप आला होता. त्याच्या आईवडिलांनी त्याला उपचारासाठी त्र्यंबकेश्वर येथे नेले, परंतु तिथे एक दिवस खासगी रुग्णालयात उपचार केल्यानंतर तेथील डॉक्टरांच्या सल्ल्याने त्याला मोखाडा येथील सरकारी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. अजयची प्रकृती जास्तच गंभीर असल्याने मोखाडा येथील डॉक्टरांनी त्याला जव्हार येथील कुटीर रुग्णालयात दाखल करायला सांगितले. अजयच्या आईवडिलांनी त्याला तात्काळ कुटीर रुग्णालयात दाखल केले. परंतु २५ जानेवारीला रात्री ९ च्या सुमारास उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अजयच्या वडिलांकडे असलेले सर्व पैसे या धावपळीत खर्च होऊन गेले होते. त्यामुळे अजयचा मृतदेह घरी कसा न्यायचा, हा प्रश्न उपस्थित झाला. त्यांनी रुग्णवाहिकाचालकाकडे चौकशी केली असता भाडे देणार असेल तरच रुग्णवाहिका मिळेल असे चालकाकडून सांगण्यात आले. परंतु जवळ पैसे नसल्याने अजयच्या कुटुंबीयांना मुलाचा मृतदेह दुचाकीवरून नेण्याची वेळ आली. रात्री कुडकुडत्या थंडीत मृतदेह दुचाकीवरून त्यांना घेऊन जावा लागला. त्यामुळे परिसरातून सरकारी यंत्रणेविषयी संताप व्यक्त केला जात असून संबंधित प्रकरणात जे दोषी असतील त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

Palghar News (पालघर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Time child body parents bike ysh
First published on: 29-01-2022 at 00:18 IST