आज जागतिक शौचालय दिन

वाडा : १९ नोव्हेंबर हा दिवस जागतिक शौचालय दिन असतो. मात्र स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाची तयारी सुरू असलेल्या या देशातील हजारो खेडय़ांत अजूनही हागणदारीमुक्ती झालेली नाही. तालुक्याचे मुख्यालय व ४० हजारांहून अधिक लोकवस्ती असलेल्या पालघर जिल्ह्यतील वाडा शहरात आजपर्यंत एकही सार्वजनिक स्वच्छतागृह तर नाहीच, पण एकही सार्वजनिक शौचालय, मुतारीची सुविधा उपलब्ध नाही. यामुळे तालुक्याच्या मुख्यालयी येणाऱ्या नागरिकांसाठी जागतिक शौचालय दिन हा ‘दीन’ ठरला आहे.

यावर्षी जिल्ह्यतील हागणदारीमुक्त झालेल्या ग्रामपंचायतीमध्ये स्वच्छतेचे सातत्य कायम राखण्यासाठी तसेच सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन, सार्वजनिक शौचालयांची उपलब्धता या अनुषंगाने केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार स्वच्छ भारत मिशन अभियान (ग्रा) टप्पा दोनची सुरुवात झाली आहे. याचाच एक भाग म्हणून १९ नोव्हेंबर या जागतिक शौचालय दिनाचे औचित्य साधून वैयक्तिक, सार्वजनिक ठिकाणे, शाळा अंगणवाडीमधील शौचालयांचा शाश्वत वापर, योग्य देखभाल व दुरुस्ती आणि आनुषंगिक सुविधाच्या उपलब्धता करण्याच्या अनुषंगाने पूरक ठरणारे विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.

१९ नोव्हेंबर हा दिवस जागतिक शौचालय दिन म्हणून पाळला जात असून ग्रामीण भागात शौचालय बांधकाम व त्याचा वापर करण्यास नागरिकांना आवाहन करण्यात येते. ज्या ठिकाणी या सुविधा उपलब्ध नसतील त्या ठिकाणी तातडीने या सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात असे निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत. मात्र वाडा नगरपंचायत अशा प्रकारची सार्वजनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात असमर्थ ठरली आहे. येथील नगरपंचायत स्थापन होण्यापूर्वी ग्रामपंचायत असतानाही या ठिकाणी सार्वजनिक प्रसाधनगृह नव्हते. नगरपंचायत स्थापन होऊन चार वर्षे उलटली असली तरी संपूर्ण शहरात एकही सार्वजनिक प्रसाधनगृह बांधण्यात आलेले नाही. याबाबत येथील नगरपंचायत प्रशासन व येथील पदाधिकारी यांच्या विरोधात नागरिकांकडून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. वाडा नगरपंचायतीमधील अनेक ठिकाणी सरकारी मालकीच्या जागा उपलब्ध असतानाही येथील निष्क्रिय कारभारामुळे सार्वजनिक सुलभ शौचालये होऊ  शकत नसल्याचे येथील नागरिकांकडून आरोप केले जात आहेत.

नगरपंचायत मालकीची वाडा शहरात जागा उपलब्ध नसल्यामुळे सार्वजनिक प्रसाधनगृह उभारण्यात अडचणी येत आहेत.

रामचंद्र जाधव, सभापती, स्वच्छता समिती, नगरपंचायत, वाडा