scorecardresearch

डहाणू समुद्रकिनाऱ्यावर प्लास्टिकचा खच ; प्रदूषणामुळे समुद्री जीवसृष्टीला धोका

डहाणू तसेच नरपड किनाऱ्यावर प्लास्टिकचा खच पडला आहे. प्लास्टिक कचऱ्यामुळे समुद्रकिनारपट्टीचे विद्रूपीकरण होत आहे.

डहाणू समुद्रकिनाऱ्यावर प्लास्टिकचा खच ; प्रदूषणामुळे समुद्री जीवसृष्टीला धोका
डहाणू समुद्रकिनाऱ्यावर मोठय़ा प्रमाणात प्लास्टिक कचरा

नितीन बोंबाडे, लोकसत्ता

डहाणू: डहाणू समुद्रकिनाऱ्यावर मोठय़ा प्रमाणात प्लास्टिक कचरा वाहून आला आहे. या कचऱ्यामुळे समुद्रातील जीवसृष्टीला धोका निर्माण झाला आहे.

डहाणू तसेच नरपड किनाऱ्यावर प्लास्टिकचा खच पडला आहे. प्लास्टिक कचऱ्यामुळे समुद्रकिनारपट्टीचे विद्रूपीकरण होत आहे. सागरी पर्यावरणाला धोका निर्माण झाला आहे. प्रदूषणामुळे मासे मिळण्याचे प्रमाणही कमी झाले आहे, त्यामुळे संबंधित प्रशासनाने येथे लक्ष देण्याची गरज स्थानिक बोलून दाखवत आहेत.

पालघर जिल्ह्यात वसई, पालघर, डहाणू तालुक्याला लांबच लांब किनारे आहेत. वसई, कळंब, अर्नाळा, नािरगी, दातिवरे, कोरे, एडवण, केळवे, माहीम, वडराई, शिरगाव, सातपाटी, दांडी, उच्छेळी, तारापूर, चिंचणी, वाढवण, गुंगवाडा, डहाणू खाडी, डहाणू चौपाटी, आगर, नरपड, चिखला, बोर्डी, झाई ही किनारपट्टीवरील गावे आहेत. येथे अनेक ठिकाणी समुद्रातून डांबर गोळय़ा, प्लास्टिक कचरा किनाऱ्यावर येत आहे. आधीच समुद्रातील तेल तवंगांमुळे सागरी जिवांवर दुष्परिणाम होतो आहे. लहान झिंगे, खेकडे, शिंपल्या आदी प्रजातींना धोका निर्माण होत आहे. प्रवाळांचे नुकसान होते आहे. त्यातच प्लास्टिक कचऱ्याचे प्रदूषण आणखी वाढत आहे. सागरी प्रदूषणामुळे अन्नसाखळीत अडथळा निर्माण होतो. परिणामी, सागरी पर्यावरण बिघडते आहे.

डहाणूची किनारपट्टी प्लास्टिकमुक्त होणे गरजेचे आहे. प्लास्टिकमुळे पर्यावरणाला म्हणजेच सागरी जीवांना धोका आहे.

– हरेश्वर मरदे, मच्छीमार नेते

मराठीतील सर्व पालघर ( Palghar ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या