पालघर : पालघर जिल्ह्यतील किनारपट्टीच्या तालुक्यांमध्ये सोमवारी दिवसभरात मुसळधार पाऊस झाल्याने जनजीवन विस्कळीत राहिले. जिल्ह्यत सरासरी १०१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

पालघर, वसई, डहाणू व तलासरी या चारही तालुक्यांमध्ये १०० मिलिमीटर पेक्षा अधिक पाऊस नोंदवण्यात आला असून यामुळे अनेक सखल भागांमध्ये पावसाचे पाणी साचले. पावसामुळे शेतीच्या कामांना चालना मिळाली व जलस्तोत्र व नद्यंमधील पाण्याची पातळी वाढली आहे.
दरम्यान मुंबई- वडोदरा द्रुतगती मार्ग विरार- डहाणू रोड पश्चिम रेल्वे चौपदरीकरण व समर्पित मालवाहू रेल्वे मार्ग यांचे काम सुरू असल्याने अनेक ठिकाणी मातीचे भराव करण्यात आले आहेत. यामुळे पाणी जाण्याच्या मार्गात अडथळा निर्माण होऊन त्यामुळे काही भागात नव्याने पाणी साचण्याचे प्रकार घडले होते. याबाबत जिल्हा प्रशासनाने सतर्क राहून पाणी जाण्याचा मार्ग मोकळा केल्याने पुढील अनर्थ टळला.

दरम्यान आज जिल्ह्यतील अनेक भागात मुसळधार पाऊस सुरुच होता. दुपारी काही काळ पावसाने विश्रांती घेतल्या नंतर जनजीवन पूर्वपदावर आले मात्र सायंकाळी पावसाने पुन्हा जोर धरला.