डहाणूत मोकाट गुरांमुळे वाहतुकीचा खोळंबा; रस्त्यातील जनावरांच्या कळपांमुळे अपघातांत वाढ

डहाणू शहर तसेच डहाणू-नाशिक राज्य मार्गावर सरावली, आशागड, गंजाड परिसरात मोकाट गुरांमुळे वाहतुकीचा प्रश्न गंभीर होत चालला आहे.

डहाणू: डहाणू शहर तसेच डहाणू-नाशिक राज्य मार्गावर सरावली, आशागड, गंजाड परिसरात मोकाट गुरांमुळे वाहतुकीचा प्रश्न गंभीर होत चालला आहे. सकाळ-संध्याकाळ रहदारीच्या रस्त्यांवर गुरांचे कळप ठाण मांडून बसलेले असतात. रात्री-अपरात्री रस्त्यावर बसलेली गुरे न दिसल्यामुळे अपघात होण्याच्या घटना घडत आहेत. या मोकाट जनावरांचा वेळीच बंदोबस्त करावा, अशी मागणी जनतेतून होत आहे.
मुख्य राज्य मार्गावर गुरांनी ठाण मांडल्यामुळे वारंवार वाहतूक कोंडी होते. त्यातच अनेक ठिकाणी रस्त्यांची अवस्थाही बिकट आहे. त्यामुळे ही समस्या वाढतच जाते. रात्री सुसाट वेगाने धावणाऱ्या वाहनांसमोर अचानक जनावर आले आणि चालकाला गाडी नियंत्रित करता आली नाही की अपघात होतात. अनकेदा गुरांना वाचवण्याच्या नादात गाडीचे नुकसान होते. चालक जखमी होतात. त्यामुळे वाहतूकदारांमध्ये तीव्र नाराजी आहे.
डहाणू नगर परिषद तसेच महामार्गावरील संबंधित ग्रामपंचायतीने याबाबत कडक कारवाई करण्याची गरज आहे. डहाणू आगार येथे नगर परिषदेचा कोंडवाडा आहे. मात्र अशा गुरांना पकडून कोंडवाडय़ात नेऊन ठेवण्यासाठीची सोय आणि यंत्रणाच उपलब्ध नाही. त्यामुळे मोकाट गुरांची संख्या वाढतच आहे. सततच्या वाहतूक कोंडीमुळे नागरिक मात्र त्रासले आहेत. नगर प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.

मराठीतील सर्व पालघर ( Palghar ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Traffic congestion cattle grazing in dahanu increase accidents herds animals road amy

Next Story
कुडूस शहराला पुराचा धोका; विकासकांकडून नैसर्गिक नाले गायब?
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी