वाडय़ात वाहतूक कोंडी समस्या कायम: नागरिक हैराण; प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप

येथील बाजारपेठेतून जाणाऱ्या मुख्य रस्त्यालगत फळ तसेच खाद्य पदार्थ विक्रेते यांच्या लागणाऱ्या बेकायदा हातगाडय़ा व वाहनांची बेशिस्त पार्किंग यामुळे येथे नेहमीच वाहतूक कोंडी होऊन पादचाऱ्यांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे.

वाडा: येथील बाजारपेठेतून जाणाऱ्या मुख्य रस्त्यालगत फळ तसेच खाद्य पदार्थ विक्रेते यांच्या लागणाऱ्या बेकायदा हातगाडय़ा व वाहनांची बेशिस्त पार्किंग यामुळे येथे नेहमीच वाहतूक कोंडी होऊन पादचाऱ्यांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. येथील नगरपंचायत प्रशासन व पोलीस प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप येथील नागरिकांकडून केला जात आहे.

वाडा शहरातील मुख्य बाजारपेठेतून जाणाऱ्या वाडा-नाशिक-देवगांव या मार्गाचे एक वर्षांपूर्वी रुंदीकरण करण्यात आले आहे. रस्त्याच्या रुंदीकरणाचा काही एक फायदा पादचाऱ्यांना तसेच या रस्त्यावर नियमित वाहतूक करणाऱ्या वाहनचालकांना झालेला नाही. रुंदीकरण करण्यात आलेल्या जागेवरच हातगाडय़ा लावल्या जातात. येथील चारचाकी, दुचाकी वाहनधारक रस्त्यावरच वाहने उभी करतात. रस्त्यालगत असलेले काही अतिक्रमणे अजून हटविण्यात आलेली नाहीत. गेल्या वर्षभरापासून काही ठिकाणी रस्त्याचे रुंदीकरणाचे काम रखडलेले आहे. रुंदीकरण करताना रस्त्यात आलेले विद्युत खांब हटविण्यात आलेले नाहीत. येथील वाहतूक कोंडीस जबाबदार असणाऱ्यांवर नगरपंचायत प्रशासन, पोलीस प्रशासन कुठलीच कारवाई करत नसल्याने ही वाहतूक कोंडी वाढतच चालली आहे, असे नागरिकांचे म्हणणे आहे.

कारवाईचा बडगा दाखविण्याची गरज
बाजारपेठेतील वाहतूक कोंडी दुर करण्यासाठी येथील रस्त्याचे रुंदीकरण करण्यात आले आहे. मात्र या रुंदीकरण करण्यात आलेल्या रस्त्यावर हातगाडय़ांचे अतिक्रमण व वाहनधारकांचे वाहनतळ झाले आहे. या अनधिकृत फेरीवाले व वाहनतळ करणाऱ्यांवर आजपर्यंत नगरपंचायत प्रशासन व पोलीस प्रशासनाने कुठलाच कडक शिस्तीचा बडगा उचललेला नाही, यामुळे ही समस्या येथे दिवसेंदिवस वाढतच आहे, असे नागरिकांचे म्हणणे आहे.
रस्त्यावर वाहने उभी करून बाजारपेठेत तासनतास फिरणाऱ्या बेजबाबदार वाहनचालकांवर कारवाई करण्याची गरज आहे. – प्रल्हाद सावंत, ज्येष्ठ नागरिक, वाडा.

रस्त्यावर अतिक्रमण करणाऱ्या हातगाडीधारक व वाहनचालक यांना याबाबत वारंवार सूचना दिलेल्या आहेत, येत्या काही दिवसांत कारवाईला सुरुवात केली जाईल. -डॉ. उद्धव कदम, प्रभारी मुख्याधिकारी नगरपंचायत तथा तहसीलदार, वाडा.

मराठीतील सर्व पालघर ( Palghar ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Traffic congestion problem persists civil harassment allegations of administration negligence amy

Next Story
जिल्हा परिषदेचा भोंगळ कारभार; पदोन्नतीचे आश्वासन, पदरात मात्र सेवानिवृती
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी