मृत्युंजय दूतांना वाहतूक पोलिसांमार्फत प्रशिक्षण

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर अपघातांतील जखमींना तातडीने प्रथमोपचार मिळण्यासाठी मृत्युंजय दूत, स्थानिक नागरिक धावून जातात.

महामार्ग वाहतूक पोलीस-रेसिडेंट फाऊंडेशन बोईसर यांच्यातर्फे उपक्रम

पालघर : मुंबई-अहमदाबाद महामार्गावर अपघातांतील जखमींना तातडीने प्रथमोपचार मिळण्यासाठी मृत्युंजय दूत, स्थानिक नागरिक धावून जातात. या जखमींना कसे हाताळावे याचे प्राथमिक ज्ञान देण्यासाठी महामार्ग वाहतूक पोलीस व द रेसिडेंट फाऊंडेशन बोईसर यांच्या संयुक्त विद्यमाने प्रथमोपचार प्रशिक्षण दुर्वेस महामार्ग पोलीस ठाण्यात घेण्यात आले.

या प्रशिक्षणामध्ये मृत्युंजय दूत यांच्यासह स्थानिक नागरिकांना अपघातप्रसंगी जखमींना तातडीने वैद्यकीय व इतर मदत मिळण्याच्या दृष्टीने प्रशिक्षणाचा हा उपक्रम स्तुत्य असल्याचे प्रतिपादन पोलीस उपअधीक्षक संदीप बागडीकर यांनी केले. मृत्युंजय दूत ही संकल्पना महामार्गावर यशस्वी ठरत असून त्यांना अधिक प्रशिक्षित करण्याच्या दृष्टिकोनातून हे प्रशिक्षण त्यांना अपघातप्रसंगी उपयोगी ठरणार आहे, असेही बागडीकर यांनी सांगितले. द रेसिडेंट फाऊंडेशनचे भूपेंद्र मिश्रा व त्यांच्या सहकाऱ्यांनी अपघातांत वेगवेगळ्या प्रकारे जखमी झालेल्या व्यक्तींना कसे हाताळावे, कसे ओळखावे, प्रथमोपचार कसा द्यावा याचे इत्थंभूत प्रात्यक्षिक दाखवले. जखमींना मदत करण्यासाठी प्रथमोपचार पेटी व मूव्हेबल स्ट्रेचर महामार्ग पोलीस ठाण्याला दिले आहेत. याचबरोबरीने महामार्गावर आग लागल्याच्या घटना लक्षात घेता आग विझवण्यासाठी अग्निरोधक सिलिंडर एम एच ४८ व महावीर सोलंकी या समूहाने पोलिसांना दिले आहे. यामुळे महामार्गावरील अपघातांतील जखमींना तातडीची मदत आता मिळेल असा विश्वास मनोर दुर्वेस महामार्ग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रकाश दिंडे यांनी व्यक्त केला. या उपक्रमामध्ये महामार्ग पोलिसांना सढळ हस्ते मदत करण्याचे आवाहन पोलीस निरीक्षक मृदुला नाईक यांनी यावेळी केले.

चारोटी महामार्ग पोलीस ठाणे अंतर्गत अशा जनजागृतीपर कार्यक्रमात मृत्युंजय दूतांसह समाजसेवी संस्था, समाजसेवक, स्थानिक नागरिक यांना समाविष्ट केले जाणार असल्याची माहिती यावेळी साहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल रायपुरे यांनी दिली. या कार्यक्रमात प्रशिक्षणार्थी म्हणून मृत्युंजय दूतांसह, वाहतूक पोलीस अधिकारी-कर्मचारी, गावातील नागरिक, महामार्गावर काम करणाऱ्या वाहन संघटनेतील प्रतिनिधी उपस्थित होते.

अग्निरोधक सिलिंडर दुर्वेस व चारोटी महामार्ग पोलीस ठाण्यात, पोलिसांच्या फिरत्या पथकाकडे देण्यात येणार आहेत.

तीन रुग्णवाहिका देण्याचा प्रस्ताव

डॉ. रंजीत उपाध्याय यांनी घोडबंदर ते गुजरात हद्दीपर्यंत महामार्गावर कुठेही अपघात झाल्यास अपघातातील जखमींना नि:शुल्क रुग्णवाहिका सेवा देण्यासाठी तीन रुग्णवाहिका देण्याचा प्रस्ताव महामार्ग पोलिसांसमोर ठेवल्याने अपघातावेळी तातडीने रुग्णवाहिका उपलब्ध होणार आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व पालघर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Training mrityunjaya dots traffic police ysh

Next Story
खते, बियाणे महाग दरात विकल्यास कारवाई
ताज्या बातम्या