समाजमंदिराचे ज्ञानमंदिरात रूपांतर; पालघर जिल्हा परिषदेचा नावीन्यपूर्ण प्रयोग

जिल्ह्यात वेगवेगळय़ा ठिकाणी उपलब्ध असणाऱ्या तसेच विशेष वापरात नसलेल्या समाज मंदिराची दुरुस्ती करुन त्यामध्ये स्पर्धा परीक्षेसाठी त्या ठिकाणी आवश्यक पुस्तक उपलब्ध करून त्यांचे अभ्यासिकेत रूपांतर करण्यात आले आहे.

pg3 samajmandir
संग्रहित छायाचित्र

नीरज राऊत

पालघर: जिल्ह्यात वेगवेगळय़ा ठिकाणी उपलब्ध असणाऱ्या तसेच विशेष वापरात नसलेल्या समाज मंदिराची दुरुस्ती करुन त्यामध्ये स्पर्धा परीक्षेसाठी त्या ठिकाणी आवश्यक पुस्तक उपलब्ध करून त्यांचे अभ्यासिकेत रूपांतर करण्यात आले आहे. अशा समाजमंदिरांचे अवघ्या ३४ लाख रुपयांमध्ये ज्ञान मंदिरात रूपांतर करण्याचा अभिनव प्रयोग पालघर जिल्हा परिषदेने १७ ठिकाणी राबवला आहे.

जिल्ह्यातील अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्तीमध्ये शासनाच्या विविध योजना तसेच लोकप्रतिनिधींच्या निधीमधून समाजमंदिरे उभारण्यात आली होती. या समाजमंदिरांचा अंगणवाडय़ांखेरीज विशेष वापर केला जात असल्याचे दिसून आले आहे. तसेच उभारणी नंतर अशा समाजमंदिरांची देखभाल दुरुस्ती व रंगरंगोटी नियमित केली गेली नसल्याने अनेक समाजमंदिरे मोडकळीला येऊन अशी ठिकाणे तरुणांसाठी एकत्र येण्याचे अड्डे बनले होते. अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्तीमधील समाजमंदिरांमध्ये शालेय व स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याच्या दृष्टीने या समाज बंधाऱ्यांची दुरुस्ती करून त्याठिकाणी अभ्यासिका उघडण्याचे योजना जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे यांनी सुचवली. या योजनेद्वारे विद्यार्थ्यांमध्ये शालेय अवस्थेपासून वाचण्याची, अभ्यासाची आवड निर्माण व्हावी, स्पर्धा परीक्षेची तयारी करता यावी या दृष्टीने विविध संबंधित संदर्भग्रंथ आणि आवश्यक पुस्तक उपलब्ध करून देणे,  त्याकरिता आर्थिक हातभार लावणे हा या मागील उद्देश आहे.

ज्ञानमंदिरात रूपांतरित करण्यात आलेल्या समाजमंदिरांना सर्व घटकांकडून उत्तम प्रतिसाद लाभत असून या ठिकाणी शालेय विद्यार्थीदेखील अभ्यासासाठी येत असल्याचे दिसून आले आहे. काही समाजमंदिरांमध्ये विद्यार्थ्यांना बसण्यासाठी जागा कमी पडत असल्याचेदेखील सांगण्यात येते. स्पर्धा परीक्षेसाठी आगामी काळात अशा होतकरू  विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्याचे  जिल्हा परिषदेचे विचाराधीन असल्याचे सांगण्यात आले. एकेकाळी तरुणांचा अड्डा असणाऱ्या समाजमंदिरांना ज्ञानमंदिरात रूपांतर झाल्याचे पालघर जिल्ह्यात प्रायोगिक तत्त्वावर दिसून आले आहे.

जबाबदारी विद्यार्थ्यांवर  

या नावीन्यपूर्ण योजनेअंतर्गत पालघर जिल्ह्यातील ग्रामपंचायत क्षेत्रातील आठ तालुक्यांची दलित वस्तीमधील १७ समजमंदिरांचे अभ्यासिकेत रूपांतर करण्यात आले असून त्या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी चार टेबल. १६  खुच्र्या , पुस्तके ठेवण्यासाठी दोन कपाट, ९० पुस्तकांचा संच, एक संगणक उपलब्ध करून देण्यात आला आहे. या अभ्यासिकेचा गावातील सर्व मुलांना लाभ घेता यावा यासाठी अभ्यासिकेची जबाबदारी अभ्यास करणाऱ्या दहा मुलांच्या गटात सोपवण्यात आली आहे. या योजनेसाठी ३४ लाख रुपये खर्च झाला असून  या वर्षी ३० नवीन समाजमंदिरांचे ज्ञानमंदिरात रूपांतर करण्यात येईल असे जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (समाज कल्याण) प्रवीण भावसार यांनी सांगितले.

मराठीतील सर्व पालघर ( Palghar ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Transformation samajmandir gyanmandir innovative experiment repair temple ysh

Next Story
डहाणू प्रदूषणाच्या विळख्यात; पर्यावरणदृष्टय़ा संवेदनशील तालुक्यातील हवेची गुणवत्ता धोकादायक
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी