पालघर : तारापूर औद्योगिक वसाहतीच्या परिसरातील घरगुती घनकचरा व्यवस्थापनाची समस्या गंभीर झाली आहे. व्यवस्थापनासाठी जागेच्या उपलब्धतेची समस्या प्रलंबित असताना कमी जागेमध्ये घरगुती घनकचऱ्यापासून बायोगॅस अर्थात वायू रूपातील इंधन तयार करण्यासाठी संयुक्त घरगुती कचरा व्यवस्थापन प्रकल्प उद्योजकांच्या संस्थेच्या पुढाकाराने उभारण्याच्या दृष्टीने पूर्वतयारी सुरू झाली आहे.

तारापूर परिसरात घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पासाठी जागेच्या उपलब्धतेचा प्रश्न गेल्या दोन दशकांपासून असताना बीएआरसीने तंत्रज्ञानाच्या आधारे विकसित केलेल्या  निसर्गऋण बायोगॅस तंत्रज्ञानाद्वारे घरगुती घनकचऱ्यापासून बायोगॅस तयार करण्याचा प्रकल्प राज्यातील अनेक नगरपालिका, औद्योगिक व गृहनिर्माण प्रकल्पांमध्ये कार्यान्वित करण्यात आला आहे.

या धर्तीवर तारापूर येथे घनकचरा प्रकल्प उभारण्यासाठी उद्योजकांची संस्था टिमा यांनी पुढाकार घ्यावा अशी मागणी बोईसरच्या सिटिझन फोरम तसेच इतर नागरिकांनी केली आहे. या संदर्भात टिमा सभागृहात या प्रकल्पाच्या पूर्वतयारीसाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला परिघातील १५ ग्रामपंचायतींचे, सामाजिक संस्थेचे प्रतिनिधी तसेच उद्योजक व टिमाचे पदाधिकारी सहभागी झाले होते.

या प्रकल्पासाठी सुमारे पाच एकर क्षेत्रफळावर हा प्रकल्प उभारला जाणार असून त्यापासून बायोगॅस निर्मिती करणे शक्य असल्याचे या प्रसंगी प्रकल्पाची माहिती देताना अवनी इंटरप्राइजेसचे अजित कडू यांनी या प्रसंगी सांगितले. ग्रामपंचायत पातळीवर गोळा करण्यात येणाऱ्या ओला व सुका कचरा याची माहिती संकलित करण्याचे काम हाती घेण्यात आले असून या माहितीच्या आधारे प्रकल्प उभारण्याच्या दृष्टीने विचार करण्यात येईल असे या बैठकीत ठरवण्यात आले. घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पासाठी बोईसर येथील एका उद्योगाने सुमारे १५ कोटी रुपये वर्ग करण्याची तयारी दर्शवली असून एमआयडीसीने या प्रकल्पासाठी जागा उपलब्ध करून द्यावी अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

नागरिकांनी घरगुती ओला व सुका कचरा वेगवेगळा साठवण्यासाठी जागृती करणे तसेच सुका कचरा आठवडय़ातून दोनदाच स्वतंत्र गोळा करण्याचे या प्रसंगी सुचविण्यात आले. टिमाचे अध्यक्ष वेलजी गोगरी यांनी सर्व घटकांच्या पाठिंब्यावर हा प्रकल्प हाती आपली संस्था पुढाकार घेईल असे आश्वासन दिले. कचरासंदर्भात माहिती संकल सिटिझन फोरमच्या मार्फत सुरू असून अनंत चतुर्दशीनंतर असे प्रकल्प प्रत्यक्ष पाहण्यासाठी जाण्याची योजना आहे असे या प्रकल्पासाठी समन्वय साधणाऱ्या अनंत कित्तूर यांनी सांगितले.

सहमतीपत्र घेण्यास प्रारंभ

तारापूर औद्योगिक क्षेत्रात संयुक्त घरगुती घनकचरा व्यवस्थापन केंद्र उभारण्याच्या दृष्टिकोनातून परिसरातील सर्व संबंधित ग्रामपंचायतीकडून संमती पत्र घेण्याचे काम सुरू झाले आहे. या प्रकल्पाच्या उभारणीसाठी आपली ग्रामपंचायत लागणारे सहकार्य करण्यास तयार आहोत, या आशयाचे सहमतीपत्र सरपंच व ग्रामसेवकच्या स्वाक्षऱ्यांनी उद्योजकांची संस्था टिमा यांच्या नावे घेतले जात आहे.