कासा: आदिवासी विकास प्रकल्प अंतर्गत चालविल्या जाणाऱ्या शासकीय आश्रमशाळा उधवा कासपाडामध्ये इयत्ता ७ वीत शिकत असलेल्या एका तेरा वर्षीय आदिवासी मुलीचा मृत्यू झाला. शिक्षकांच्या हलगर्जीमुळे मुलीचा मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.

मिताली सुरेश चौधरी (राहणार उधवा केवडीपाडा) हिला ताप येत असल्याने मंगळवारी दुपारी उधवा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले होते. तेथे वैद्याकीय अधिकाऱ्यांनी मुलीची प्रकृती गंभीर असल्यामुळे  तिला खानिवली येथील शासकीय रुग्णालयात घेऊन जा असा सल्ला दिला; परंतु तसे न केल्यामुळे बुधवारी पहाटे पाच वाजेच्या सुमारास मुलीची तब्येत आणखीन बिघडली. त्यामुळे तिला पुन्हा प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आले.  आणि तेथून केंद्राच्या रुग्णवाहिकेतून अधिक उपचारासाठी खानिवली येथील शासकीय रुग्णालयात घेऊन जात असताना तिचा रस्त्यातच मृत्यू झाला. शवविच्छेदनानंतर तिला सिकलसेलचा आजार झाल्याचे आढळून आले. हे निदान आधीच झाले असते तर उपचाराने मुलीचा जीव वाचला असता असे उधवा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. रितेश पटेल यांनी सांगितले.

 मुलगी आजारी असल्याची माहिती पालकांना देऊन तिला वेळीच रुग्णालयात दाखल करावयास पाहिजे होते, मात्र शाळेच्या मुख्याध्यापक तसेच अधीक्षकांनी तसे काहीही केले नसल्याने मुलीचा मृत्यू झाला. त्यास आश्रमशाळेचे शिक्षक जबाबदार असल्याने त्याच्यावर कारवाई करण्याची मागणी पालकांनी केली आहे. दरम्यान, याबाबत शासकीय आश्रमशाळा मुख्याध्यापक मनोहर जगताप यांच्याकडून घटनेची माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी दूरध्वनी उचलला नाही.