बोईसर : पालघर तालुक्यातील बोरशेती गावाच्या हद्दीत सूर्या नदीत दोन तरुणांचा बुडून मृत्यू झाला आहे. सुट्टीत पोहण्याचा आनंद लुटण्यासाठी नदीत गेलेल्या तरुणांना पाण्याच्या प्रवाहाचा अंदाज न आल्याने शनिवारी दुपारच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली.

बोईसर दांडीपाडा येथे राहणारे काही तरुण शनिवारी दुपारी पोहण्याचा आनंद लुटण्यासाठी बोरशेती जवळील सूर्या नदीत गेले होते. मात्र पोहताना नदीच्या पाण्याचा अंदाज न आल्याने दुपारी ३३० वाजल्याच्या सुमारास ते बुडू लागले. त्यापैकी एक तरुण पोहत किनाऱ्यावर आला मात्र शोमेश साहेबराव शिंदे (१८)आणि करण चेतन नायक हे दोन तरुण ( दोघे राहणार दांडीपाडा, बोईसर) खोल पाण्यात बुडाले. सोबतच्या तरुणांनी त्यांना शोधण्याचा प्रयत्न केला असता त्यांना यश न आल्याने त्यांनी स्थानिक आणि पोलिसांना या घटनेची माहिती दिली.

हेही वाचा…पाकिस्तान कैदेतून सुटका होणाऱ्या ३५ कैदींमध्ये डहाणू मधील पाच खलाशांचा समावेश

पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच मनोर आणि बोईसर पोलिसांनी बोरशेती येथील घटनास्थळी पोचून सूर्या नदीच्या खोल पात्रात अग्निशमन दलाचे जवान, जीव रक्षक आणि स्थानिकांच्या मदतीने शोधकार्य सुरू केले. संध्याकाळच्या सुमारास दोन्ही तरुणांचे मृतदेह सायंकाळी सात वाजल्याच्या सुमारास पाण्याबाहेर काढण्यास यश आले असून या घटनेची मनोर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.