पालघर : पालघर शहरालगत असलेल्या नंडोरे ग्रामपंचायत हद्दीतील अरहाम इंडस्ट्रियल पार्कमधील आनंद इंजिनीअरिंग व एचबी आईस्क्रीम डेअरी या दोन कारखान्यांना भीषण आग लागल्याची घटना रविवारी दुपारी घडली. या घटनेत दोन्ही कंपन्या जळून खाक झाल्या आहेत. या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
नंडोरे गावातील अरहाम औद्योगिक वसाहतीमधील मोठय़ा गाळय़ांमध्ये मध्यम उद्योग सुरू आहेत. रविवारी दुपारी २.३० वाजल्याच्या सुमारास यातील आनंद इंजिनीअरिंग कंपनीला आग लागली. ती वेगाने पसरल्यामुळे त्याची झळ लगतच्या एच. बी. या आईस्क्रीम उत्पादक कारखान्याला बसली.
पालघर नगर परिषद, औद्योगिक वसाहत, बोईसर व वसई-विरार महापालिकेच्या अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले होते. अनेक शर्थीनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. घटनास्थळी महसूल व पोलीस प्रशासनाने पंचनामा केला आहे. पुढील तपास सुरू आहे. आगीचे नेमके कारण समजू शकलेले नाही.