कासा: कासा गावातील शिव मंदिराजवळील अंदाजे ५० फूट खोल विहिरीत दोन दिवसांपासून अडकून पडलेल्या मांजरीच्या दोन पिल्लांना अखेर प्राणी मित्र आणि वन विभागाच्या संयुक्त प्रयत्नातून सुखरूप बाहेर काढण्यात यश आलं. मात्र या धाडसी रेस्क्यू मोहिमेदरम्यान एक मांजर आक्रमक झाली आणि तिने प्राणी मित्र सनी गवळी यांना चावा घेतला. यानंतर त्यांच्यावर तत्काळ कासा येथील सरकारी रुग्णालयात उपचार करण्यात आले.

ही घटना समजताच ग्रामस्थ विशाल पागधरे यांनी तातडीने वन विभाग आणि प्राणी मित्रांना माहिती दिली. काही वेळातच प्राणी मित्र घटनास्थळी दाखल झाले. विहीर खोल आणि अरुंद असल्याने बचावकार्य अत्यंत जोखमीचं होतं. मात्र प्राणी मित्र दानी रावत आणि सनी गवळी यांनी दोरीच्या सहाय्याने विहिरीत उतरून धाडसाने कार्य सुरू केलं.

मांजरी आक्रमक झाल्यामुळे मोहिमेदरम्यान अडथळे आले. विशेषतः सनी गवळी यांना चावा घेतल्याने त्यांना किरकोळ जखम झाली. तरीही त्यांनी मोहिम पूर्ण करण्याचा निर्धार कायम ठेवला. अखेर दोन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर दोन्ही पिल्लांना सुखरूपपणे बाहेर काढण्यात आलं.

या मोहिमेत यतीश पुजारी, सनी गवळी, दानी रावत, प्रणय धानमेहेर यांच्यासह वनपाल नितीन कांबळे आणि पद्माकर पवार यांचा मोलाचा सहभाग होता. त्यांचं समन्वय आणि धाडस यामुळे ही मोहिम यशस्वी झाली.

गावकऱ्यांनी या सर्व प्राणी मित्रांचे आणि वन विभागाचे आभार मानले असून, ही घटना माणुसकी आणि प्राणीमित्रत्वाचे एक सुंदर उदाहरण ठरली आहे.

याच महिन्याच्या सुरुवातीला मोखाड्यात जंगली माकडाच्या हल्ल्यात अनेक नागरिक जखमी झाले होते. या माकडाला पकडण्यासाठी वनविभागाच्या कर्मचार्यानी शर्तीचे प्रयत्न केले मात्र, ते त्यांच्या हातावर तुरी देऊन पसार होत होते. नागरिकावर हे माकड हल्ला करत होते. त्यामुळे मोखाड्यातील पवारपाडा ते जव्हार फाट्या दरम्यान या माकडाची दहशत निर्माण झाली होती. वनविभागाने जाळी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला होता. मात्र ते त्यांच्या तावडीतून पसार झाले होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या माकडाने वनविभागाच्या कर्मचार्याची डोकेदुखी वाढवली होती. अखेर माकड पवारपाडा नजिकच्या पेट्रोल पंपाजवळील हाॅटेल जवळ येताच, वनविभागाच्या कर्मचार्यानी जाळ्यात अडकवुन या माकडाला जेरबंद करुन पिंजर्‍यात डांबले होते. त्यामुळे दहशती खाली वावरणार्या नागरीकांनी सुटकेचा निश्वास सोडला होता. या माकडाला आता त्र्यंबकेश्वर येथील ब्रम्हगिरी पर्वतावर त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.