scorecardresearch

पालघर : जिल्ह्य़ात शिक्षकांची दोन हजार पदे रिक्त ; विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम

पालघर जिल्ह्यातील शासकीय शाळांमध्ये आजही दोन हजार शिक्षकांची पदे रिक्त असल्याने त्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर होत आहे

पालघर : जिल्ह्य़ात शिक्षकांची दोन हजार पदे रिक्त ; विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम
(संग्रहीत छायाचित्र)

पालघर जिल्ह्यातील शासकीय शाळांमध्ये आजही दोन हजार शिक्षकांची पदे रिक्त असल्याने त्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर होत आहे, त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यातील शिक्षण व्यवस्थेचा खेळखंडोबा झालेला आहे. शिक्षकांची सर्वाधिक पदे रिक्त असलेला पालघर हा महाराष्ट्रातील पहिला जिल्हा आहे.
२०१९ मध्ये शिक्षक भरती व महाराष्ट्रभर बंदी उठवल्यानंतरही पालघर जिल्ह्यातील हजारो रिक्त पदे अजूनही भरली गेलेली नाहीत. विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची आभाळावस्था असल्याने पालक वर्गही आता नाराजी व्यक्त करत आहे.

शिक्षकांची पदे रिक्त असल्याने विद्यार्थ्यांच्या अध्यापनावर त्याचा थेट परिणाम जाणवत आहे, त्यामुळे सरकारी शिक्षणाचा दर्जाही सुमार होत चालला आहे. शासन प्रशासनाच्या उदासीन धोरणाचा फटका जिल्ह्यातील शिक्षण व्यवस्थेवर बसत आहे. जिल्ह्यात हजारो पदे रिक्त असल्याचे येथील प्रमुख लोकप्रतिनिधींना माहीत असतानाही यासाठी त्यांनी कुठेही प्रयत्न केल्याचे दिसत नाही, असे आरोप केले जात आहेत, तसेच ही पदे रिक्त असल्यामुळे इतर शिक्षकांवर अध्यापनाचा अतिरिक्त तणाव जाणवत असून ते सध्या मानसिक तणावाखाली दिसून येत आहेत. एका शिक्षकावर दोन ते तीन शिक्षकांचा अतिरिक्त कार्यभार दिला जात असल्याचे दिसून येत आहे.

करोनानंतर जिल्हा परिषद शाळांमध्ये विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढली आहे. पालक वर्ग ही शासकीय शिक्षण व्यवस्थेवर विश्वास ठेवून विद्यार्थ्यांना जिल्हा परिषद शाळेत दाखल करत आहेत. एकीकडे पालक वर्ग जिल्हा परिषदेच्या शिक्षण व्यवस्थेवर विश्वास दाखवत असताना दुसरीकडे या शिक्षण व्यवस्थेमध्ये या विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी शिक्षकांची पदे रिक्त आहेत. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेत जिल्हा परिषदेमध्ये मानधन तत्त्वावर कंत्राटी शिक्षक नियुक्ती करण्याची गरज निर्माण झाली आहे. शिक्षण हक्क कायद्याची पायमल्ली करणारी ही घटना आहे. सरकारं येतात आणि जातात, परंतु शिक्षणातील प्रश्न सुटताना दिसत नाहीत. आजही जिल्ह्यातील काही ठिकाणी पहिली पिढी शिक्षण घेताना दिसते. त्यामुळे यांना तात्काळ न्याय मिळायला हवा असे मराठी अभ्यास केंद्राचे सदस्य सुशील सेजुळे यांनी म्हटले आहे.

रिक्त पदे
शिक्षण विभागात विस्तार अधिकारी श्रेणी दोनची मंजूर पदे ४४ असताना ११ पदे कार्यरत आहेत. विस्तार अधिकारी श्रेणी तीनची २७ पदे मंजूर असताना एकही पद भरण्यात आलेले नाही. केंद्रप्रमुखांची १५० पदे मंजूर आहेत. त्यापैकी ५१ पदे कार्यरत आहेत. तर ९९ पदे रिक्त आहेत. सर्व माध्यमाच्या मुख्याध्यापकांची ३७० पदे मंजूर आहेत. तर केवळ ७४ पदे कार्यरत आहेत व २९६ पदे रिक्त आहेत. प्राथमिक शिक्षकांची मराठी विभागासाठी ७०९७ पदे मंजूर तर ५१८१ पदे कार्यरत आहेत. १९१६ पदे रिक्त आहेत. उर्दू माध्यमाची १२० पदांपैकी ६३ शिक्षक कार्यरत तर ५७ पदे रिक्त आहेत. हिंदी विभागात २१ पदांपैकी ११ पदे रिक्त आहेत. गुजराती विभागाची ५४ पदे मंजूर ३६ पदे कार्यरत, तर अठरा पदे आजतागायत रिक्त आहेत.

शिक्षक भरतीबाबत सातत्याने शासनाकडे पाठपुरावा सुरू आहे. सेस फंडातून कंत्राटी सव्वाशे शिक्षक नेमले आहेत. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही याची काळजी घेत आहोत. –ज्ञानेश्वर सांबरे, उपाध्यक्ष व शिक्षण सभापती, जिल्हा परिषद, पालघर

मराठीतील सर्व पालघर ( Palghar ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या