डहाणू – तलासरी तालुक्यातील उधवा येथील मुख्य बस थांबा गेल्या अनेक वर्षांपासून अतिक्रमणाच्या विळख्यात अडकला असून सध्या तो नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. या थांब्यावर विक्रेत्यांनी पूर्णपणे कब्जा केल्यामुळे प्रवाशांना उभे राहण्यासाठी साधी जागाही उरलेली नाही. बसची वाट पाहणाऱ्या प्रवाशांना सध्या जागेअभावी रस्त्याच्या कडेला असलेल्या गटारीवर किंवा थेट मुख्य रस्त्यावर उभे राहावे लागत आहे. प्रवाशांची ही गैरसोय अपघाताला निमंत्रण देणारी ठरत असून प्रशासनाचे याकडे पूर्णपणे दुर्लक्ष होत आहे.

उधवा मुख्य बाजारपेठ परिसरातील बस थांबा आजूबाजूच्या पाच ते सहा गावांसाठी दळणवळणाचे अत्यंत महत्त्वाचे केंद्र आहे. येथून दररोज शेकडो विद्यार्थी शाळा आणि महाविद्यालयात जाण्यासाठी बस प्रवासावर अवलंबून असतात. तसेच आरोग्याच्या समस्या, न्यायालयाची कामे आणि इतर शासकीय कामांसाठी नागरिक तलासरी व डहाणूकडे जाण्यासाठी याच थांब्याचा वापर करतात. मात्र, याठिकाणी असलेला पूर्वीचा बस थांबा अतिक्रमणामुळे नामशेष होण्याच्या मार्गावर असून महिला, वृद्ध आणि विद्यार्थ्यांना रस्त्याकडेला आणि गर्दीच्या वेळी रस्त्यावर ताटकळत उभे राहून बसची वाट पाहावी लागत आहे.

उधवा येथील बस थांबा महाराष्ट्र आणि गुजरातचे विभाजन होण्यापूर्वी तत्कालीन महाराष्ट्रातील नारगोल बस आगाराच्या मालकीचा होता. विभाजनानंतर नारगोल बस आगर गुजरात मधील उंबरगाव तालुक्यात गेले. मात्र त्यांनी उधवा बस स्थानकाची मालकी डहाणू बस आगाराकडे दिली नसून डहाणू आगाराने देखील याकडे दुर्लक्ष केले. यामुळे उधवा येथील स्थानक अनेक वर्ष पोरके राहिले असून २०१५ – १६ दरम्यान तलासरी तहसीलदार यांच्या पुढाकारानंतर डहाणू आणि नारगोल आगर व्यवस्थापक यांच्या समन्वयाने उधवा येथील थांबा डहाणू आगराकडे हस्तांतरित करण्यात आला.

स्थानिक ग्रामस्थ देवराम कुरकुटे यांनी दिलेल्या माहितीनुसार, डहाणू आगार व्यवस्थापकांनी ग्रामपंचायतीला पत्र देऊन बस थांब्यातील अतिक्रमण हटवण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र, ग्रामपंचायत आणि आगार व्यवस्थापनाच्या उदासीन धोरणामुळे हे अतिक्रमण आजही कायम आहे. प्रशासकीय समन्वयाचा अभाव आणि स्थानिक पातळीवरील अनास्थेमुळे सर्वसामान्य प्रवाशांना मात्र दररोज प्रवास करताना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

बस थांब्याच्या परिसरात मूलभूत सुविधांचा देखील अभाव आहे. येथे प्रवाशांना बसण्यासाठी आसन व्यवस्था, पिण्याचे पाणी आणि मूलभूत सुविधा उपलब्ध नाही. बाजार परिसरात स्वच्छतागृह असूनही तिथे अस्वच्छतेमुळे नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत असून आरोग्याचा प्रश्नही निर्माण झाला आहे. शैक्षणिक आणि व्यावसायिक दृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या या बस थांब्याचे अतिक्रमण हटवून तिथे त्वरित मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशी आग्रही मागणी उधवा परिसरातील नागरिक आणि प्रवाशांकडून केली जात आहे.

गुजरात मधील उंबरगाव तालुका १९६० सालापर्यंत महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्याचा भाग होता. महाराष्ट्र आणि गुजरातच्या विभाजनानंतर उंबरगाव गुजरातमध्ये गेले मात्र त्या काळी गुजरातच्या नारगोल आगारांतर्गत येणारा उधवा येथील बस थांबा विभाजनानंतर काहीसा दुर्लक्षित राहिला. २०१५-१६ च्या दरम्यान तलासरी तहसीलदारांनी या प्रकरणात लक्ष घातल्यानंतर नारगोल आगाराने या थांब्याची मालकी डहाणू आगाराकडे सोपवली होती. मात्र, मालकी बदलून दहा वर्षांनंतरही या थांब्याच्या परिस्थितीत कोणताही सकारात्मक बदल झालेला नाही.

आम्ही उधवा ग्रामपंचायतीला पत्र देऊन बस थांब्यासाठी अडचण होत असल्याबाबत कळवले होते. तसेच याठिकाणी होत नसल्यास पर्यायी जागा उपलब्ध करून देण्याची सूचना केली होती. थांब्यातील अतिक्रमण हटवणे आवश्यक आहे. मात्र ग्रामपंचायत कडून कोणत्याही प्रकारची सूचना आम्हाला मिळालेली नाही. तरीही याविषयी पुन्हा पाहणी करून ग्रामपंचायतीला सूचित करण्यात येईल. – चेतन देवधर, डहाणू बस आगार व्यवस्थापक

बस थांब्यामध्ये अतिक्रमण केलेल्या विक्रेत्यांना वेळोवेळी सूचना दिल्या आहेत. ग्रामपंचायत कडून विक्रेत्यांना पर्यायी जागा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. लवकरच इथले अतिक्रमण दूर करून सुविधा उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न आहे. – निर्मला फरले, सरपंच उधवा ग्रामपंचायत